‘ त्या ‘ निमित्ताने काँग्रेसला बदनाम कराल तर.. ‘, नाना पटोलेंचा हल्लाबोल

शेअर करा

काँग्रेस पक्षाने एकमताने नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली होती मात्र त्यांच्या घरात असलेला अंतर्गत वाद आम्हाला त्यावेळी माहिती नव्हता. त्या वादात आम्हाला पडायची देखील नाही मात्र त्याचा फायदा घेत काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला आहे.

नाना पटोले हे नगर येथील जेष्ठ नेते विनायकराव देशमुख यांच्या एका कुटुंब सोहळ्यासाठी नगर येथे आलेले होते तेव्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘ कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला होता. आम्ही त्यांना दोन एबी फॉर्म कोरे पाठवलेले होते . त्यांच्या घरातील अंतर्गत विषय आम्हाला त्यावेळी माहिती नव्हता. सदर प्रकरणी आमची बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झालेली असून ही चर्चा योग्य वेळी समोर आणू , ‘ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर देखील नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला असून कोशारी हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि त्यांनी महापुरुषांचा अनेकदा अपमान केलेला आहे. अशा राज्यपालाला राज्यात राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी महाराष्ट्रातील जनतेची आणि काँग्रेस पक्षाची देखील भूमिका आहे , असे देखील त्यांनी स्पष्ट केले .


शेअर करा