तोफखाना पोलिसांचा ‘ फिल्मी स्टाइल ‘ पाठलाग अन अखेर आरोपी ताब्यात

शेअर करा

नगर शहरात सध्या तोफखाना पोलिसांनी केलेल्या एका कारवाईची जोरदार चर्चा सुरू असून गेल्या दोन दिवसांपासून एक आरोपी पोलिसांना चकवा देत फिरत होता. पोलिसांनी चक्क धावत्या ट्रॅक्टरमध्ये चढून त्याला ताब्यात घेतलेले आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे हा प्रकार घडलेला असून तोफखाना पोलिसांच्या कारवाईचे नगरकरांकडून कौतुक केले जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संदीप उर्फ बाला राजू घोरपडे ( राहणार कोठला ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह केलेला होता. त्यानंतर तो काही दिवस तुरुंगात देखील होता मात्र तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने या अल्पवयीन मुलीच्या बहिणीला शोधून काढले आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली सोबतच तिच्यावर वार देखील केले. त्याने या अल्पवयीन मुलीच्या बहिणीला पोलिसात तक्रार कोणी दिली ? असे म्हणत तिच्यावर वार केलेले होते तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

गुप्त सूत्रांच्या माध्यमातून तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना आरोपीच्या लोकेशनबद्दल माहिती समजली आणि त्यानंतर त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. संदीप घोरपडे हा श्रीरामपूर तालुक्यातील फतेबाद येथे नातेवाईकाकडे लपून बसण्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर आरोपीला देखील पोलीस येत असल्याची कुणकुण लागली आणि त्यानंतर त्याने एका ट्रॅक्टरमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांचे पथक आपल्या पाठीमागे आहे हे लक्षात आल्यानंतर ट्रॅक्टरमधून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न होता मात्र त्याच्या आधीच पोलिसांनी ट्रॅक्टरमध्ये उड्या घेतल्या आणि तात्काळ त्याला ताब्यात घेतले. मंगळवारी संध्याकाळी त्याला तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद मुजावर यांच्य्या पथकाने राहुरी पोलिसांच्या सोबत ही कारवाई केलेली आहे.


शेअर करा