रुईछत्तीशीतील ‘ मुन्नाभाई ‘ प्रकरणाची व्याप्ती वाढली , काय आहे प्रकरण ?

शेअर करा

नगर शहरापासून अगदी जवळ असलेल्या रुईछत्तीशी इथे ज्ञानेश्वर निवृत्ती पवार ( वय 63 राहणार साकत तालुका नगर ) याच्यावर कारवाई करण्यात आली असून कंपाउंडर म्हणून काम करणारा हा व्यक्ती परिसरात आल्यानंतर त्याने दवाखाना सुरू केला आणि अवघ्या काही दिवसात त्याला चांगला प्रतिसाद देखील येऊ लागला. तब्बल वीस वर्षांपासून अधिक काळ त्याने हा बनावट दवाखाना चालवण्याचे समोर आलेले असून या माध्यमातून कित्येक माया जमवलेली आहे . विशेष म्हणजे आरोग्य यंत्रणा इतके दिवस झोपलेली होती का ? असा देखील यामुळे प्रश्न निर्माण होत असून राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा प्रकार शक्य नाही त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आता पोलिसापुढे आहे.

ज्ञानेश्वर निवृत्ती पवार ( वय 63 वर्ष ) असे आरोपीचे असून जवळपास वीस वर्षांपासून बिनबोभाट पद्धतीने त्याचा हा दवाखाना सुरू होता. परिसरातील अनेक नागरीक त्याच्या या दवाखान्यात यायचे आणि जनावरांपेक्षाही खराब अशा गोठ्याच्या शेडमध्ये टाकलेल्या खाटेवर पवार यांच्याकडून सलाईन टोचून घ्यायचे. आजही परिसरात ‘ पवार हा चांगला डॉक्टर होता त्याचा गुण यायचा ‘ अशा प्रतिक्रिया निश्चितच दुर्दैवी आहेत . बोगस डॉक्टरवर कारवाई केल्यानंतर नागरिकांकडून देखील आरोग्य विभागाला आरोपीच्या कचाट्यात उभे करत ‘ जर कुणाला त्याचा फरक पडत असेल तर तुम्हाला तुमचं काय जातं ? ‘ असा प्रश्न देखील नागरिक विचारतात मात्र नागरिकांच्या जीविताशी असा खेळण्याचा अधिकार अशा मुन्नाभाई डॉक्टरला कोणी दिला ? हा देखील एक मोठा प्रश्न आहे.

एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. अधिकाऱ्यांनी छापा टाकला त्यावेळी चार खाटांवर चार रुग्ण उपचार देखील घेत होते. ज्ञानेश्वर पवार नागरिकांना देत असलेली सलायन ही देखील एका कोडवर्डच्या माध्यमातूनच एका ठराविक दुकानातच मिळायची. आरोपीला ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी त्याने दुसऱ्या एका डॉक्टरचे नाव सांगून आपल्याकडे कुठलीही पदवी नाही असेही सांगितले . आपण हा दवाखाना दुसऱ्या एका डॉक्टरच्या वतीने सांभाळत आहोत असे सांगितल्यानंतर पवार याच्यासोबत त्या डॉक्टरच्या विरोधात देखील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा