आयुक्तसाहेब..कार्यालयासमोर आत्मदहन होण्याची वाट पाहताय का ?

शेअर करा

महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमध्ये वेळोवेळी अतिक्रमणांचे सर्वेक्षण तसेच बेकायदेशीर बांधकामावर कारवाई देखील केली जाते मात्र नगर महापालिकेला या सर्व प्रकाराची ऍलर्जी असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर पंकज जावळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कारवाईची अपेक्षा होती मात्र याआधीच्या आयुक्तांसोबतच डॉक्टर पंकज जावळे यांच्याबाबतीत देखील नगरकरांचा भ्रमनिरास होत आहे तर नगररचना आणि अतिक्रमण विभाग फक्त गोरगरिबांच्याच झोपड्या तोडून आपली ‘ कार्यशैली ‘ दाखवत आहे मात्र धनदांगड्या लोकांवर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे .

नगर शहरातील सक्कर चौकातील असेच एक प्रकरण सध्या समोर आलेले असून अतिक्रमण विरोधी पथक तसेच प्रभाग समिती ४ यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामावर कुठलीही कारवाई होत नसल्याने विविध कुटुंबांनी महापालिकेच्या समोरच उपोषणाला सुरुवात केलेली आहे. सहा तारखेपासून त्यांनी उपोषण सुरू केलेले असून बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न झाल्यास आठ तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा देखील पीडित कुटुंबांनी दिलेला आहे. यासंदर्भात त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक दिलेले असून त्यामध्ये महापालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला ‘ समोरच्या व्यक्तीने बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे तर तुम्ही देखील बेकायदेशीर बांधकाम करा ‘ असा अजब सल्ला दिल्याचा देखील दावा करण्यात आलेला आहे.

सचिन अरुण रणसुभे असे उपोषण सुरू करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते सक्कर चौकातील सोनार मळा स्टेशन रोड येथे राहतात. सक्कर चौकातील टीपी स्कीम तीन प्लॉट नंबर १२३ मध्ये हे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले असून त्या बांधकामाविरोधात वेळोवेळी महापालिकेत तक्रार अर्ज केले. पुरावे देखील सादर केले मात्र महापालिकेचे प्रभाग क्रमांक चारचे अधिकारी आणि अतिक्रमण विभाग यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले असे म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून देखील कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आजदेखील या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू असून राजेंद्र वामन सोनार आणि सुरेश किसनराव गायकवाड आणि इतर व्यक्ती हे बेकायदेशीर बांधकाम करत आहेत असे म्हटलेले आहे.

राजेंद्र सोनार आणि सुरेश गायकवाड यांच्या बेकायदेशीर बांधकामावर महापालिका कुठलीही कारवाई करत नसल्याने त्यांचे मनोबल वाढलेले असून त्यांनी या आधी देखील पीडित कुटुंबास मारहाण, धमकी, दमदाटी शिवीगाळ असे प्रकार केलेले आहेत असे उपोषणकर्त्या व्यक्तींचे म्हणणे आहे. सदर व्यक्तीपासून कुटुंबाला जीविताचा धोका निर्माण झालेला आहे याची तक्रार वेळोवेळी संबंधित विभागाकडे आपण केलेली आहे मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी तसेच पोलीस प्रशासनाने देखील कुठलीही कारवाई केली नाही म्हणून 8 फेब्रुवारी रोजी आपण महापालिका कार्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करणार आहोत असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय,नगर विकास राज्यमंत्री,आमदार संग्रामभैय्या जगताप,जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिलेले आहे.

तक्रारदार यांनी म्हटल्याप्रमाणे एकीकडे महापालिका बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण विरोधात असल्याचा देखावा निर्माण करते मात्र दुसरीकडे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीच्या बांधकामावर कुठलीही कारवाई करत नाही. सदर व्यक्ती सध्या सक्कर चौकात सहा ते सात हजार स्क्वेअर फुट बांधकाम आणि पत्र्याचे शेड उभारत असून पालिका अधिकारी तक्रारदार व्यक्ती यांनाच त्यांचे बांधकाम बेकायदेशीर आहे पण तुम्ही देखील बेकायदेशीर बांधकाम करा असा सल्ला देतात असे सांगत सदर ले आउटमध्ये महापालिकेची देखील जागा आहे त्यावर देखील अतिक्रमण झालेले आहे मात्र महापालिकेला त्यावर देखील कारवाई करावीशी वाटलेली नाही यावर संताप व्यक्त केलेला आहे. सदर बांधकामासाठी कुठलीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही आणि महापालिकेच्या नाकावर टिच्चून हे सर्व बांधकाम चालू आहे मात्र महापालिकेकडून कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आली नाही उलट तक्रारदार यांचीच दिशाभूल करण्याचे प्रकार महापालिकेकडून सुरू असल्याबद्दल संताप व्यक्त करत आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे .


शेअर करा