नगरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई , तब्बल ‘ इतक्या ‘ टाक्या धरल्या

पेट्रोल डिझेल आणि सीएनजी यांच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या असल्याने पोटापाण्यासाठी रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तींना देखील मोठ्या संघर्ष करावा लागत आहे मात्र यातून घरगुती गॅस स्वतःच्या वाहनात अवैध पद्धतीने भरून घेतला जात असल्याने खरोखर स्वयंपाकासाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या ग्राहकांपर्यंत या टाक्या पोहोचतच नाही आणि मोठ्या प्रमाणात काळाबाजार यामध्ये होत आहे. शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच एक कारवाई करण्यात आलेली असून प्रोफेसर चौक ते भिस्तबाग रोड या रस्त्यावर उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या एका अवैध रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून 39 टाक्या जप्त केलेल्या आहेत.

गुप्त सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांना मिळालेली होती त्यानंतर पथक कारवाईच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा एक जण गॅसच्या टाकीमधून गॅस काढून तो वाहनात भरत होता. पोलिसांनी त्याला आणि त्याच्यासह तिथे आलेल्या ग्राहकास देखील ताब्यात घेतले . घटनास्थळी भारत गॅस कंपनीच्या 31 भरलेल्या तर सात रिकाम्या टाक्या आढळून आलेल्या आहेत.

तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल तनवीर शेख, हेमंत खंडागळे, सुयोग सुपेकर यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. सनी दत्ता शिंदे ( वय वीस राहणार वैदूवाडी पाईपलाईन रोड ) आणि ग्राहक असलेला युसुफ नजीर पठाण ( वय 55 राहणार भातोडी ) अशी यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची व्यक्तींची नावे आहेत. प्रोफेसर चौकापासून भिस्तबाग दरम्यान असलेल्या एका सोसायटीच्या वस्तीत असलेल्या मोकळ्या जागेत हा प्रकार सुरू होता. तोफखाना पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर थेट लोकेशन असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा कारभार बिनबोभाट सुरू असल्याची देखील माहिती आहे.