
नगरकरांच्या सांधेदुखीची टेस्टिंग घेण्यासाठी म्हणून चर्चेत आलेल्या शहरातील गुलमोहर रोडचे अखेर काम सुरू झालेले असून गेल्या दोन दिवसांपासून गुलमोहर रोडवर डांबर आणि खडी टाकून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. रस्त्यावर खडे आणि डांबराचा थर अखेर पडलेला असून हा रस्ता आत मऊ होणार असल्याने सांधेदुखीची टेस्टिंग घेण्याचा आनंद नगरकर आता इथे घेऊ शकणार नाहीत अशा खोचक प्रतिक्रिया परिसरातील नागरिक देत आहेत.
नगर शहरातील गुलमोहर रोडची गेल्या दोन वर्षांपासून भयानक अवस्था झालेली होती. मागील वर्षी काम सुरू करण्यात आले मात्र लवकर काम उरकले नाही म्हणून पावसाळा आला आणि पुन्हा सुरुवातीपासून काम करण्याची वेळ आली. महापालिकेकडून या रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून अत्यंत धीम्या गतीने या रस्त्याचे काम याआधी सुरू होते. वेळेत काम पूर्ण न केल्यानंतर पुन्हा डबल काम करावे लागते आणि सर्व प्रक्रिया पुन्हा पार पाडत मोठा वेळ खर्च होतो त्यामुळे नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होतात.
आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी या रस्त्याची पाहणी केली त्यावेळी तेथे त्यांच्यासोबत शिल्पकार असलेले प्रमोद कांबळे, माजी नगरसेवक निखिल वारे तायगा शिंदे, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे तसेच महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. लवकरात लवकर या रस्त्याचे काम निदान आता तरी पावसाळा सुरू होण्याच्या आत उरकून घ्यावे अन्यथा पुन्हा हेच काम परत करून किती दिवस महापालिका ठेकेदारांची घरे भरणार असा देखील संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत.