नागपूर हादरलं …सशस्त्र गुंडानी भर चौकात व्यावसायिकाला गाडीतून बाहेर काढून केली हत्या

शेअर करा

उपराजधानी नागपूर एका धक्कादायक हल्ल्याने शनिवारी हादरून गेले असून शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या भोळे पेट्रोल पंपावर सशस्त्र गुंडांनी एकाची निर्घृण हत्या केली. भर चौकात दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. किशोर बिनेकर उर्फ बाल्या असे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गुन्हेगारी जगतात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय होता.

उपलब्ध माहितीनुसार, संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास 5 हल्लेखोर पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसले होते. किशोर बिनेकर हा आपल्या कारने पेट्रोल पंपाच्या जवळून जात असताना आरोपींनी त्याची कार अडवली आणि त्याना बाहेर खेचलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर धारदार शस्त्रांनी त्याची हत्या केली. त्यानंतर लगेचच त्यांनी बाईकवर बसून घटनास्थळावरन पळ काढला.

नागपूर शहरातला भोळे पेट्रोल पंप हा वर्दळीचं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. शहरातल्या मध्य वस्तीत असलेल्या या पेट्रोल पंपावर कायम वर्दळ असते. याच ठिकाणी हा थरार घडला आहे. किशोर बिनेकर हा एक रेस्टॉरंट चालवत होता. आपसी वादातून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बिनेकर हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला असतानाच पोलीस आले मात्र पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. घटना घडली त्या ठिकाणापासून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर एक किलोमीटरच्या परिसरातच आहे. त्यामुळे ही घटना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

बाल्या बिनेकर हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर हत्याकांड, अपहरण करणे, मारहाण करणे, शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे, जुगार भरवणे असे जवळपास २२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मात्र अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी झाली त्यामुळे पोलिसांना बंदोबस्तात वाढ करावी लागली.

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, सदर हत्याकांडातील प्रमुख आरोपी चेतन हजारे याचे वडील सुनील हजारेचा २००१ मध्ये बाल्या बिनेकरने खून केला होता. त्यावेळी चेतन हा केवळ १५ वर्षाचा होता. काही वर्षातच चेतन हा गुन्हेगारी जगतात आला. त्याने जम बसविताच बाल्याचा खून करून बापाच्या हत्याकांडाचा बदला घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्याने गेल्या काही महिन्यापासून बाल्याची रेकी करीत होता. प्रमुख आरोपी चेतन हजारे याला देखील आता अटक करण्यात आली आहे.

बाल्याचा गुन्हेगारी जगतात मोठा दबदबा होता. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. तसेच तो शहरातील सर्वात मोठा जुगार अड्डा माफिया होता. बाल्याचा गेम झाल्यामुळे त्याच्या टोळीतील समर्थक चिडले आहेत. त्यामुळे चेतनच्या टोळीशी त्यांचा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसांत प्रतिस्पर्धी टोळीतील गेम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


शेअर करा