मनपाच्या नगररचनात ‘ बनावट ना हरकत ‘ डोळे झाकून झाले मान्य ,अर्थपूर्ण कि दबाव ?

शेअर करा

नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात असलेल्या एका हॉस्पिटलच्या बांधकाम परवानगीसाठी नगर महापालिकेच्या नगररचना विभागाला दाखल करण्यात आलेला लष्कराचा ना हरकत दाखला अक्षरशः बनावट असल्याचा प्रकार समोर आलेला असून सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे. महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी देखील याप्रकरणी अहवाल मागवलेला आहे असे शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेले आहे. आता आयुक्त कारवाई करणार कि अहवालाच्या चौकशीतच वेळ मारून नेणार हे येत्या काळात पाहावे लागेल.

नगर शहरातील सावेडीतील गुलमोहर रोड परिसरात आणि छत्रपती संभाजी नगर रोडवर असलेल्या एका हॉस्पिटलच्या बांधकाम परवानगी प्रकरणी परवानगीसाठी लष्कराचा ना हरकत दाखला मिळवणे गरजेचे होते. छत्रपती संभाजीनगर रोडच्या पलीकडील बाजूला लष्करी हद्द असल्याने हा दाखला गरजेचा होता आणि बांधकाम परवाना मिळवतेवेळी तो महापालिकेत देण्यात आलेला होता. सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी लष्कराच्या उपविभागीय कार्यालयाकडे संबंधित ना हरकत दाखल्याची प्रत मागितली होती त्यावर उपविभागीय कार्यालयाने असा कुठलाही ना हरकत दाखला दिलेला नाही तसेच यासंदर्भात पत्रव्यवहार देखील झालेला नाही असे स्पष्ट केले होते.

शाकीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली होती आणि पोलीस उपाधीक्षक यांनी शेख यांचा जबाब नोंदवला होता. महापालिकेला संबंधित ना हरकत दाखल्याची खात्री करून आवश्यक ती कारवाई करण्याचे देखील कळवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने शेख यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला. महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी सदर प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांना दिलेला होता त्यानुसार प्रदीप पठारे यांनी चौकशी केली त्यावेळी दाखला देण्याचा अधिकार हा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स नवी दिल्ली यांना असल्याचे समोर आले .

सदर दाखला हा खरा आहे की बनावट आहे याची देखील महापालिकेच्या नगररचना विभागाने कुठलीही शहानिशा केली नाही आणि संबंधित व्यक्तीला बांधकाम परवानगी देण्याआधी त्याची सत्यता देखील पडताळून पाहिली नाही. नगर महापालिकेच्या नगररचना विभागाचा अनागोंदी कारभार अर्थपूर्ण असल्याची देखील चर्चा संपूर्ण शहरात सुरू झालेले असून महापालिकेच्या आवक जावक रजिस्टरला देखील दाखला जमा केल्याची कुठलीही नोंद नाही . लष्कराच्या स्टेशन हेडक्वार्टरकडे देखील शाकीर शेख यांनी माहिती मागवलेली होती त्यावेळी स्टेशन हेडक्वार्टर यांनी देखील 2016 ते 2021 पर्यंत असा कुठलाही ना हरकत दाखला दिलेला नाही हे स्पष्ट झालेले असल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाचे कर्मचारी आणि मान्यता देणारे डोळे झाकून काम करतात का ? हा प्रश्न निर्माण झालेला असून सखोल चौकशी झाल्यास अशी अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे .


शेअर करा