नगर शहरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू होताच दागिने गायब ? : नातेवाईकांचा आरोप

  • by

नगर शहरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू होताच तिचे दागिने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून विशेष म्हणजे हा प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला आहे . कोरोनाबाधित महिलेवर नगर इथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मयत महिलेच्या नातेवाईकांनी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दिली असून याबाबत पोलिसांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे.

भिंगार परिसरात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मृत्यू होण्याच्या आधी सदर महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव आला होता. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर दागिने नसल्याचे निदर्शनास आले.जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून याबद्दल समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली.

तोफखाना पोलिसांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पत्र देऊन सदर महिलेवर ज्या वार्डात उपचार सुरू होते तेथील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली आहे. दाखल करतेवेळी सदर महिलेच्या अंगावर दागिने होते का ? हे देखील यातून स्पष्ट होईल. जिल्हा रुग्णालयातून सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर सदर मयत महिलेच्या दागिन्याबाबत माहिती मिळू शकेल असे तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी सांगितले.