सुरभी हॉस्पिटलचे ‘ बनावट ना हरकत ‘ फक्त हिमनगाचे टोक

शेअर करा

नगर महापालिकेच्या नगररचना विभागाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आलेला असून नगररचना विभागाचे अधिकारी डोळे झाकून काम करतात की काय ? असा प्रश्न नगरकरांसमोर निर्माण झालेला आहे. नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल महाराजाजवळ उभारण्यात आलेल्या सुरभी हॉस्पिटलच्या बांधकाम परवानगीसाठी नगररचना विभागाला सादर करण्यात आलेला संरक्षण विभागाचा ना हरकत दाखला चक्क बनावट असल्याचे समोर आलेले आहे. सदर प्रकरणी हॉस्पिटलची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेविका पल्लवी जाधव यांच्यासह इतर नगरसेवकांनी केलेली आहे.

सुरभी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी बांधकाम परवाना देताना संरक्षण विभागाचा ना हरकत गरजेचा होता कारण छत्रपती संभाजीनगर रोडच्या दुसऱ्या बाजूला लष्करी हद्द आहे. नगररचना विभागाने संबंधित कागदपत्रे व्यवस्थित पडताळून पाहिले नाहीत आणि त्यानंतर तिथे आता टोलेजंग इमारत उभी राहिलेली आहे. आपल्या विभागात डोळे झाकून काम करण्यात आल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला असून ‘ सुरभी हॉस्पिटलच्या इमारत मालकाला बनावट ना हरकत दाखला प्रकरणी नोटीस पाठवण्यात येणार आहे. दाखला बनावट असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल ‘, असे सांगितलेले आहे.

नगर महापालिकेच्या नगररचना विभागात अशाच स्वरूपाची अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. नगररचना विभागात फ्लेक्स बोर्डवर नवीन बांधकाम परवाना मिळवण्यासाठी गरजेच्या असलेल्या कागदपत्रांची यादी लावलेली आहे मात्र प्रत्यक्षात समोरील व्यक्तीचे बांधकाम याची फाईल काढल्यानंतर अवघी एक ते दोन कागदपत्रे त्यात आढळून येतात. प्लिंथ पर्यंत बांधकाम आल्यानंतर नगररचना विभागाकडून त्याची शहानिशा करून त्यानंतर पुढील बांधकाम करणे असे आदेश बांधकाम सुरू करण्याच्या परवाना देतेवेळीच दिलेले असतात मात्र कुठेही नगररचना विभागाचे कर्मचारी फिरकत नाहीत त्यामुळे मनमानी पद्धतीने सावेडीत आणि शहरात अशा बांधकामांनी धुमाकूळ घातलेला आहे. तक्रारदार व्यक्ती यांनी तक्रार केल्यानंतर त्याच्या तक्रारीच्या आधारे नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचे खिसे गरम केले जातात त्यामुळे कारवाई देखील काहीही होत नाही अशा अनेक तक्रारी नगरकर सांगत आहेत.


शेअर करा