‘ माझी गाडी मोकळी आहे भाडे असल्यास सांगा ‘ : शेवगावच्या सोयाबीनचोर टोळीचा पर्दाफाश

शेअर करा

वाहतुकीच्या नावाखाली सोयाबीन चोरणाऱ्या टोळीचा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार पोलिसांनी शेवगाव मध्ये येऊन पर्दाफाश केला आहे. गुंतागुंतीच्या तपासातून तब्बल नऊ महिन्यांनी सदर आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. शेवगाव तालुक्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अंबादास राधाकिसन सानप ( 36 राहणार ठाकुर पिंपळगाव तालुका शेवगाव ) याच्यासह आरोपी योगेश आबासाहेब बोडके (वय 36 ) गणेश भिमराव निकम ( वय 35 ,दोघेही राहणार शेवगाव ) या तिघांना लोणार पोलिसांनी अटक केली आहे.

सानप याने वाशीम येथील एका हॉटेलमधून मोबाईल फोन चोरून चिखली येथील एका ट्रान्सपोर्ट मालकाला चोरलेल्या फोनवरून संपर्क साधला. ‘ माझी गाडी मोकळी आहे भाडे असल्यास सांगा’, असा फोन केला. संबंधित ट्रान्सपोर्ट मालकाने सानप यास चिखली येथून नागपूर इथे सोयाबीन घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार सानप याने 3 जानेवारी 2020 रोजी सुमारे अकरा लाख पाच हजार रुपये किमतीचे 257 क्विंटल सोयाबीन त्याच्या ट्रकमध्ये भरून नागपूरकडे घेऊन न जाता थेट शेवगाव येथे आणला आणि शेवगाव येथील एका विक्रेत्याला विकला.

नागपूर येथे माल पोहोचला का नाही त्यामुळे सदर माल चोरी गेल्याचा संशय बळावल्याने 10 जानेवारी रोजी लोणार पोलिसात गुन्हा दाखल झाला. आरोपी सानप याच्याविरुद्ध वाशिम येथेही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जगन्नाथ विष्णुपंत जायभाय ( राहणार लोणार जिल्हा बुलढाणा) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी ट्रान्सपोर्ट मालकास आलेल्या मोबाईल क्रमांक वरून तपासाची दिशा ठरवून तपास केला. तपासादरम्यान चिखली येथून चोरलेला सोयाबीन शेवगाव येथे आणून विकल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.


शेअर करा