पंख्याला गळफास घेत असल्याचे छायाचित्र तिच्या व्हाट्सअपवर पाठवले अन म्हणाला …

शेअर करा

फेसबुक मैत्रीण असलेल्या तरुणीला लग्नासाठी आत्महत्येची धमकी देणाऱ्या तरुणाला दामिनी पथकाने बुधवारी चांगलीच समज देत त्याच्या मामाच्या हवाली केले आहे. औरंगाबाद शहरातील ही घटना असून हा तरुण सातत्याने सदर तरुणीस लग्नाची गळ घालत होता. लग्न न केल्यास आत्महत्या करीन अशी धमकी देत होता.

उपलब्ध वृत्तानुसार, मुकुंदवाडी परिसरातील रहिवासी तरुण हा शहरातील एका बिअर शॉपी मध्ये काम करतो तर तक्रारदार तरुणी शहरातील एका हॉटेलमध्ये स्वागत कक्षात काम करते. फेसबुकवर दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना त्यांचे मोबाईल नंबर दिले आणि संपर्कात राहू लागले. दरम्यान तो तिच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू लागला त्यामुळे त्याचा स्वभाव तिला अजिबात आवडला नाही आणि तिने त्याच्यासोबतची मैत्री संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. तो मात्र तिला लग्नासाठी आग्रह करू लागला आणि तिने त्याला नकार दिला.

मात्र यानंतरही तो तिचा पिच्छा सोडेना. काही दिवसांपासून तो लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागला आणि आत्महत्येची धमकी देऊ लागला. दोन दिवसांपूर्वी तर त्याने पंख्याला गळफास घेत असल्याचे छायाचित्र तिच्या व्हाट्सअप वर पाठवले, या प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरली आणि तिने दामिनी पथकाशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती त्यांना दिली.

पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी आजले आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी मुकुंदवाडी परिसरात त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि यानंतर त्याला चांगली समज दिली. त्याला मुकुंदवाडी ठाण्यात नेले तेव्हा पीडितेने मात्र त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी तरूणाच्या मामाला बोलावून घेत त्यांच्या ताब्यात त्याला दिले.


शेअर करा