नाशिकमध्ये मोठा मासा गळाला , घरात 54 तोळे सोनं अन लाखांची रक्कम

शेअर करा

नाशिक जिल्ह्यात लाचखोरीचे एक अजब प्रकरण समोर आलेले असून नाशिक येथील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदी निवडून आल्यानंतर निवडीच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रार प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी 30 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेले आहे . त्यांची चार दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे . त्यांचा साथीदार संशयित वकील शैलेश सभद्रा याची देखील रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यानंतर खरे याच्या घराची झडती घेतली त्यावेळी तिथे पंधरा लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम आणि जवळपास 38 लाख रुपये किमतीचे 54 तोळ्याचे सोन्याचे दागिने आढळून आलेले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सतीश खरे यांच्या घराच्या झडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे आढळून आलेली असून खरे याची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येवला, सटाणा या वेगवेगळ्या तालुक्यात विविध बँकांमध्ये खाती असल्याचे देखील समोर आलेले असून इतरही काही स्थावर मालमत्तेसंदर्भात कागदपत्रे आढळून आलेली आहेत . प्रकरणाची व्याप्ती वाढलेली पाहायला मिळत असून सतीश खरे यांच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठवर पोहोचलेले आहेत याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.


शेअर करा