सुप्रीम कोर्टाचा ‘ बुवा ‘ ला दणका , कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या महाराजांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून चक्क सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून जामखेड तालुक्यातील एका गावातील महिलेने या बाबाच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात जामखेड तालुक्यातील एका महिलेने जून 2022 पासून सप्टेंबर 2022 पर्यंत आपल्याला सोन्याच्या दागिन्यांचे आमिष दाखवत तसेच दमदाटी करत आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत असे आरोप केलेले होते . त्यानंतर बुवासाहेब खाडे याच्या विरोधात कलम 376 एनसोबतच कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आपल्याला अटक होऊ नये म्हणून चक्क सुप्रीम कोर्टापर्यंत खाडे महाराजाने धाव घेतली होती मात्र सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळला असून कोणत्याही क्षणी या बुवाला अटक होण्याची शक्यता आहे. बुवासाहेब खाडे याचे अश्लील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालेले असून सदर प्रकार समोर आल्यानंतर नगर आणि बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती .

पीडित महिला ही पती सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने जामखेड तालुक्यातील एका गावात राहते. मठात गेल्यानंतर संकटे दूर होतात अशी तिची धारणा होती त्यातून तिने हनुमानगड येथे वारीला जायला सुरू केले. दर आठवड्याला वारीला गेल्यानंतर ती हनुमानगड येथे मुक्काम देखील करायची त्यावेळी खाडे महाराज आणि या महिलेची चांगलीच ओळख झाली. खाडे महाराजाची मुलगी हिने देखील ‘ मी आणि महाराज सांगतील तसे तू ऐकत जा. महाराजांची सेवा करण्यासाठी तू इथेच राहा, ‘ असा देखील या महिलेला आग्रह केला.

काही दिवसांनी संशयित आरोपी महाराज हे महिलेच्या नातेवाईकाच्या गावी आले असताना महाराजांनी आपल्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ‘ तू तुझ्या नवऱ्याकडे जाऊ नकोस. तुला दागिने करून देईल. तुझ्या सोबत लग्न करीन. तुझ्या मुलाला चांगले सांभाळीन. त्याच्या नावावर देखील पाच एकर जमीन करीन आणि जर तू कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारीन ‘, अशी देखील महाराजांनी आपल्याला धमकी दिली असे महिलेचे म्हणणे आहे. महाराजाने आपल्यावर तीन महिन्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला असे महिलेचे म्हणणे आहे .