दोन एकर विकली पण सैन्यातील मुलगा सापडला नाही , आईवडील म्हणतात की..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून सैन्यात गेलेला मुलगा पुन्हा परत न आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे वृद्ध असलेल्या आई-वडिलांनी अक्षरशः आमरण उपोषण सुरू केलेले आहे. आपल्या मुलाच्या शोधात अवघा देश पालथा घातला मात्र अद्यापही आपला मुलगा सापडत नसल्यामुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात मुलाचा शोध लागावा यासाठी मुलाचे आई-वडील उपोषणाला बसलेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, रवींद्र भागवत पाटील असे सैन्यात असलेल्या मुलाचे नाव असून 2005 साली ते भरती झालेले होते . देशसेवा करत असल्याचा आनंद आई-वडिलांना झाला होता आणि 2005 पासून तर 2010 पर्यंत रवींद्र हे सैन्यात काम करत आई-वडिलांच्या देखील संपर्कात होते मात्र 2010 नंतर ते अचानकपणे बेपत्ता झाले तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांचा कुटुंबीयांशी कुठलाही संपर्क नाही असे त्यांचे वडील भागवत पाटील आणि आई बेबाबाई यांनी म्हटलेले आहे.

हतबल झालेले आई-वडील यांनी सैन्य कार्यालयात अनेकदा संपर्क देखील केला मात्र व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत . रवींद्र यांचे वडील भागवत पाटील यांनी आमच्या मुलाचा पत्ता मिळत नसल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये माहिती घेतली तिथे जाऊन देखील फिरलो मात्र आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या वयामुळे आम्हाला आता ते शक्य होत नाही. अद्यापपर्यंत आमच्या मुलाचा पत्ता लागलेला नाही मात्र त्याला शोधण्याच्या नादात आतापर्यंत दोन एकर शेती देखील विकावी लागलेली आहे.

दुसऱ्या मुलाची पत्नी आणि मुलगा आमचा सांभाळ करत नाही सोबतच त्याचा शोध घेण्याच्या नादात आहे ती देखील शेती तुम्ही विकून टाकाल असे दुसऱ्या मुलाकडून सांगण्यात येत आहे. आमच्या मुलाविषयी कुणाकडूनच खात्रीशीर माहिती आम्हाला मिळत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून आम्ही शेवटची दाद मागत आहोत असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. सैन्यात काम करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर येणारी ही वेळ अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने तात्काळ पावले उचलत कुटुंबीयांना त्यांचा संपर्क करून देणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.


शेअर करा