धक्कादायक.. महिला निवासी डॉक्टरला रस्त्यावरून झुडुपात ओढून नेण्याचा प्रयत्न : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेविषयी संताप व्यक्त होत असताना औरंगाबाद येथील घाटी वसतिगृहातून सुपर स्पेशालिटी ब्लॉककडे जाणाऱ्या महिला निवासी डॉक्टरला चाकू दाखवून बाजूच्या झुडुपात नेण्याचा प्रयत्न दोन मवाल्यांनी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्या दोन मवाल्यांनी डॉक्टरचे तोंड दाबण्याचा ही प्रयत्न केला मात्र डॉक्टरने आरडाओरडा केल्याने मवाली तिथून पळून गेले आणि मोठा अनर्थ टळला.

घाटीतील निवासी डॉक्टरांचे वसतिगृह ते सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या जुन्या रस्त्यावर हा प्रकार घडला. त्या डॉक्टर रात्री बारा वाजता सुपर स्पेशलिटी ब्लॉक मध्ये ड्युटीवर जात होत्या. वसतिगृहापासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर त्या असतानाच दोन तरुणांनी त्यांना चाकू दाखवून अडवले आणि डॉक्टरचे तोंड दाबून त्यांना झुडपात तोडण्याचा प्रयत्न केला मात्र डॉक्टरांनी आरडाओरडा केल्याने त्यांनी तिथून पळ काढला.

घाबरलेल्या महिला डॉक्टरने धावतच सुपर स्पेशलिटी ब्लॉक गाठले. तेथील सुरक्षा रक्षक सहकारी आणि वरिष्ठांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली . सुरक्षारक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र त्यांना आसपास कोणीही आढळले नाही या घटनेमुळे घाटी परिसरात खळबळ उडाली असून कोरोना संकटकाळात जीव ओतून काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सदर घटना घडल्यानंतर सुपर स्पेशलिटी ब्लॉकच्या परिसरात वाढलेली झाडेझुडपे हटवण्याचे काम गुरुवारी हाती घेण्यात आले. तसेच घाटीतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून सार्वजनिक बांधकाम विभागाला पथदिवे बसवावेत अशी सूचना केली. मेडिसिन विभागाचे जवळून एक रस्ता बेगमपुराकडे जातो तर दुसरा स्पेशालिटी ब्लॉक कडे जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे झुडपे वाढलेली असल्याने रात्री तिथे अंधारच असतो. रात्री अंधार असल्याने तसेच रस्ता निर्मनुष्य असल्याने ह्या रस्त्याने जाणाऱ्या महिलांचा जीव मात्र धोक्यात येत आहे.


शेअर करा