न्यायालयाच्या आवारातच भरदिवसा रक्ताचा सडा.. ८० वर्षीय वृद्धाने पत्नीस संपवले : काय आहे प्रकार ?

शेअर करा

शेत जमिनीच्या वादातून वृद्धाने मुलगा व नातवाच्या मदतीने पहिल्या पत्नीचा चक्क न्यायालयाजवळ चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे घडली आहे. केसरबाई कारभारी गवळी वय 75 राहणार भिंगी असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती कारभारी किसन गवळी वय 80 यास पोलिसांनी अटक केली आहे सावत्र मुलगा भरत कारभारी गवळी आणि नातू अतुल भरत गवळी हे दोघे फरार आहेत.

उपलब्ध वृत्तानुसार, प्रमुख आरोपी कारभारी गवळी यांची घायगाव शिवारात शेतजमीन आहे. पहिली पत्नी केसरबाई यांच्यापासून एक मुलगी झाल्यानंतर दीड वर्षात त्या माहेरी भिंगी इथे निघून गेल्या होत्या. जवळपास 40 वर्षांपासून केसरबाई ह्या माहेरीच राहत होत्या. कारभारी गवळी यांनी केसरबाई हिला सोडून बीजलाबाई यांच्याशी दुसरे लग्न केले होते. सुरुवातीपासूनच केसरबाई यांचा पती कारभारी आणि सोबत बीजलाबाई यांच्या जमिनीचा वाद होता त्यामुळे जमीन आणि पोटगी मिळावी यासाठी केसरबाई यांनी 1972 चाली न्यायालयात दावा दाखल केला होता.

कारभारी गवळी यांनी पोटगी पोटी केसरबाई यांना चार एकर आणि 30 गुंठे जमीन दिली होती परंतु बीजलाबाई यांचा मुलगा भरत व नातू अतुल भरत गवळी हे जमिनीचा ताबा देत नसल्यामुळे जमिनीच्या ताब्यासाठी वैजापूर न्यायालयात दावा सुरू होता. शनिवारी तारीख असल्याने किसन तांबे हे आजी केसरबाई यांना सोबत घेऊन न्यायालयात आले होते.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास किसन तांबे हे आजी केसरबाई यांच्यासह न्यायालयाजवळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर बसलेले असताना अचानक कारभारी गवळी, अतुल गवळी, भरत गवळी आणि 30 ते 35 वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीने किसन तांबे यांना घेरले आणि केसरबाई यांना पकडले.

कारभारी यांनी सोबत आणलेल्या चाकूने केसरबाई यांच्या डोक्यात पोटात आणि छातीत सपासप वार केल्याने केसरबाई यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर तात्काळ पोलिस घटनास्थळी हजर झाले आणि कारभारी गवळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर गर्दी पाहून अतुल गवळी, भरत गवळी आणि त्यांच्यासोबतचा एक व्यक्ती हे फरार झाले.


शेअर करा