सोशल मीडियावर सध्या जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या एका शिक्षकाची जोरदार चर्चा सुरू असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी येथील ही घटना आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये असलेला शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आला आणि वर्गातील खोलीत वाळूवरच झोपी गेला . पालकांच्या तक्रारीवरून अखेर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार, यशवंत श्रावण वासनिक ( वय 54 साईनगर जिल्हा चंद्रपूर ) असे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिक्षकाचे नाव असून गेल्या सहा-सात महिन्यांपासून ते सहाय्यक शिक्षक म्हणून या शाळेत कार्यरत आहे. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास शाळा सुरू असताना दारूच्या नशेत कोणीतरी धिंगाणा घालत आहे असे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले आणि इतर नागरिकांनी तिथे धाव घेतली.
ग्रामपंचायत सदस्य मनोज प्रेमदास दांदडे यांनी शाळेत जाऊन पाहिले त्यावेळी यशवंत हे चटईवर झोपून होते आणि मद्यधुंद अवस्थेत काहीही बरळत होते . पोलिसांनी शाळा गाठून पाहणी केली त्यावेळी दारूच्या नशेत ते आढळून आल्यानंतर तात्काळ त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आले. सदर शिक्षकांच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी असे चार वर्ग असून एकूण सात शिक्षक या शाळेत काम करतात. आरोपी शिक्षकाला दारूचे व्यसन असून रोज शाळेत येण्यापूर्वी तो दारू पितो आणि नंतर शाळेत येतो अशी माहिती विद्यार्थ्यांनी देखील पालकांना दिलेली आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची कल्पना आहे मात्र तरी देखील कोणी याकडे लक्ष दिलेले नाही असा आरोप पालकांनी केलेला असून उद्या काही अघटीत प्रकार घडला तर त्यासाठी जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालकांनी विचारलेला आहे.