सरकारी कामासाठी नागरिकांकडून लाच घेताना पकडल्यानंतर सरकारी अधिकारी काय करतील याचा काही भरवसा नाही असाच एक प्रकार सध्या मध्यप्रदेशातील भोपाळ इथे समोर आलेला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकासमोर एका तलाठी भाऊसाहेबांनी लाचेची पूर्ण रक्कम चावून गिळल्याचे समोर आलेले आहे. हेराफेरी चित्रपटात सुनील शेट्टी ज्या पद्धतीने कागद गिळून खातो त्याच पद्धतीने या भाऊसाहेबांनी नोटा चावून गिळलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , कटनीच्या बिलहरी येथे तलाठी म्हणून काम करणारे गजेंद्र सिंह यांनी एका व्यक्तीकडून जमीन मोजणी आणि अहवालाच्या बाबतीत लाचेची मागणी केलेली होती त्यानंतर पीडित व्यक्तीने 10 जुलै 2023 रोजी लोकायुक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली. तक्रारीची शहानिशा सुरू असतानाच लाचेची रक्कम घेण्यासाठी गजेंद्रसिंह यांनी समोरील व्यक्तीला कार्यालयात बोलावलेले होते मात्र त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची टीम संपूर्ण नियोजन करून तिथे पोहोचली होती.
जबलपूरच्या लोकायुक्तांच्या पथकाने गजेंद्र सिंह याला रंग हात पकडले त्यावेळी जमिनीच्या मोजणीसाठी म्हणून त्याने मागितलेली पाच हजार रुपयांची लाच त्याच्या हातात होती. लाचेची रक्कम म्हणून 500 रुपयांच्या नऊ नोटा दिलेल्या होत्या आणि पाचशे रुपये देणे बाकी होते. कारवाई करण्यास अधिकारी आल्याचे समजताच त्याने अधिकाऱ्यांसमोर नोटा तोंडात घातल्या आणि चावण्यास सुरुवात केली.
अधिकाऱ्यांनी त्याच्या तोंडातून नोटा काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने अधिकाऱ्यांच्या देखील बोटाचा चावा घेतला त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या देखील बोटांना इजा झाली. अखेर गजेंद्र सिंह याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याने गिळलेल्या नोटांचा लगदा बाहेर काढण्यात आला . सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.