भाजपच्या पदाधिकाऱ्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई , एक वर्षासाठी नाशिकला केले स्थानबद्ध : नगरची बातमी

शेअर करा

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील येथील आपटी येथील माजी सरपंच व भाजप युवा मोर्चाचा कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे याच्यावर पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली असून गोरेला नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यातील आपटी येथील नंदू गोरे याच्यावर सन 2015 ते 2020 या कालावधीत जामखेड पोलिस स्टेशनला हाणामारी,आर्म एक्ट,धमकावणे असे विविध प्रकारचे सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी जामखेड येथील धोकादायक व्यक्ती म्हणून गोरे याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव राहुल द्विवेदी यांना पाठवला होता.

प्रभाकर पाटील यांच्या प्रस्तावाची जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ नोंद घेतली आणि आरोपीस स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पोलिस निरीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले आणि नाशिक कारागृहात रवाना केले .


शेअर करा