महालक्ष्मी मल्टिस्टेटच्या चार संचालकांना ‘ अखेर ‘ नगरमधून अटक : अशी झाली कारवाई ?

शेअर करा

अल्प मुदतीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून विविध योजनांच्या नावाखाली ठेवी स्वीकारल्या आणि 59 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील सिडको पोलिसांनी नगर येथील महालक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट क्रेडिट सोसायटीच्या चार संचालकांना शनिवारी अटक केली. अशोक गंगाधर जाधव, धैर्यशील शिवाजी जाधव, राहुल दामले आणि राजेंद्र पारेख सर्वजण राहणार. अहमदनगर अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी तक्रार दाखल झाल्यापासून हे पोलिसांना सापडत नव्हते.

उपलब्ध माहितीनुसार, अहमदनगर येथील महालक्ष्मी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची औरंगाबादमधील सिडको परिसरात शाखा होती. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या नावाखाली मुदत ठेवीवर उत्तम परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. सोसायटीवर विश्वास ठेवून लोकांनी सोसायटीकडे लाखो रुपये ठेवीच्या स्वरूपात ठेवले. मुदत ठेवींची मुदत संपल्यानंतर ठेवीदारांना परतावा देण्याची वेळ येताच अचानक सोसायटीचे कार्यालय बंद केले आणि आरोपी फरार झाले. (Four directors of Mahalakshmi Multistate arrested from Ahmednagar )

विविध प्रयत्न आणि अनेकदा मागणी करूनही सोसायटीने ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत केल्या नाहीत त्यामुळे मंजुषा हातेकर यांच्या तक्रारीवरून गतवर्षी सिडको पोलीस ठाण्यात सोसायटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते. नवे पोलिस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी गुन्हे प्रलंबित ठेवू नका तसेच आर्थिक गुन्हे असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करा असा सक्त आदेश पोलिसांना दिला होता.

पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री अहमदनगर गाठले आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून संचालकांना ताब्यात घेऊन औरंगाबादला आणले. शनिवारी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उर्वरित संचालक आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक गिरी यांनी सांगितले


शेअर करा