अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्यावर ‘ मोठी ‘ कारवाई : वाचा बातमी

शेअर करा

महिलेचे लैंगिक शोषण करून तिला मारहाण करणाऱ्या नगर शहर कोतवालीचा पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्यावर अखेर मोठी कारवाई करण्यात आली. अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला पोलीस निरीक्षक विकास वाघ याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. एका महिलेने विकास वाघ याने वारंवार धमकी देत अत्याचार केल्याची फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पाठविलेल्या अहवालानुसार पोलीस महानिरीक्षकांनी वाघ यास निलंबित केले आहे. ( Ahmednagar police inspector Vikas Wagh suspended for sexual harassment )

अत्याचाराची घटना घडली त्यावेळी विकास वाघ कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक होते. सरकारी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत व मारहाण करत विकास वाघ याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अत्याचारास प्रतिकार केल्यास कंबरपट्ट्याने वाघ याने मारहाण केल्याचेही महिलेने फिर्यादीत म्हटले होते . विकास वाघ कोतवाली पोलीस ठाण्यात असताना वादग्रस्त ठरल्यानंतर वाघ याच्यावर काय कारवाई होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून राहिले होते.

विकास वाघ याची एकंदरीत करिअरच वादग्रस्त राहिलेली आहे. याआधीचे देखील एक प्रकरण असून हे दुसरे प्रकरण घडल्याने वाघ याच्या कारनाम्याची नगर शहरात मोठी चर्चा आहे. 29 सप्टेंबरला विकास वाघ विरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाला त्यावेळी विकास वाघ आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वाघ गायब आहे.

नक्की प्रकरण काय आहे ?

नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ याच्या विरोधात महिलेचा छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .याप्रकरणी नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडित महिलेने फिर्याद दिली होती . गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रवाना केली आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, 2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलिस ठाण्याच्या कार्यालयात आलेल्या 26 वर्ष महिलेशी वाघ याने ओळख वाढवली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित महिलेच्या घरी गेला. तिथे तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत वाघ याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तिने प्रतिकार केला असता वाघ याने तिला कंबर पट्टा जोरदार मारहाण केली तसेच ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकीन अशी धमकी देखील दिली. त्यानंतर वाघ यांने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला.पीडित महिलेचे वय हे २६ असून माझ्या ९ वर्षाच्या मुलाच्या जीविताला धोका असल्याने आजवर मी हे सहन केले असे पीडितेचे म्हणणे आहे .

पीडित महिला ही गरोदर राहिल्याची समजताच वाघ याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि मारहाण केली . पीडिता शुद्धीत आल्यानंतर ‘ मी लवकरच तुझ्याशी लग्न करणार आहे.. आता तू ह्या गोळ्या खा ‘ असे सांगून गर्भपातही घडवून आणला. या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला.

ही बाब वाघ याला समजताच त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली तसेच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या. 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने मीरावली पहाडावर नेऊन तिच्यावर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून वाघ याच्या विरोधात बलात्कार,मारहाण तसेच जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


शेअर करा