‘ मग काय उखडणार बुल्डोजर सरकार ‘ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

शेअर करा

राज्यातील मंदिरे सुरु करण्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात या मुद्द्यावरुन लेटर वॉर सुरु आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं होतं. यावर अमृत फडणवीसांनी शिवसेनेला डिवचत “बुल्डोजर सरकार माझं काय उखडणार?” असा खोचक सवाल करून शिवसेनेला आव्हान दिले आहे .

“माझ्याकडे ना घर, ना दार; मग काय उखडणार बुल्डोजर सरकार,” असा प्रश्न अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या लेटर वॉरवरुन अमृता फडणवीसांनी याआधी देखील ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. “वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले होते.

त्यावर शिवसेनेच्या पालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीसांना जोरदार उत्तर दिलं होतं. “अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. जर आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेनं घेतला होता.


शेअर करा