नगर एमआयडीसी येथील एक कोटीच्या लाच प्रकरणाची राज्यस्तरावर प्रचंड चर्चा झालेली असून तब्बल एक कोटी रुपयांची लाच खाणाऱ्या अधिकाऱ्यांचे देखील पितळ उघडे पडलेले आहे. सदर प्रकरणी लाचखोर सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांच्यातील संभाषण देखील सध्या तपास यंत्रणेच्या हाती आलेले असून मुख्य सूत्रधार गणेश वाघ हाती आल्यानंतर तपासाला गती येणार आहे. सद्य परिस्थितीत तो धुळे इथे नोकरी करत असून कारवाई झाल्याचे समजताच फरार झालेला आहे.
आत्तापर्यंतच्या तपासामध्ये उपअभियंता असलेला गणेश वाघ हा नगर एमआयडीसीमध्ये येण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसीत काम करत होता . तक्रारदार व्यक्ती आणि तो यांच्यात देखील जुनी ओळख असून तेव्हापासून त्यांच्यात आर्थिक संबंध असल्याची चर्चा आहे. तक्रारदार व्यक्ती हे एमआयडीसी येथे वेगवेगळ्या एमआयडीसीत काम घेतात आणि त्यामध्ये गणेश वाघ हा देखील अभियंता कम पार्टनर असल्याची असल्याचा अंदाज आहे . दोघांच्या पार्टनरशिपमध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून काहीतरी बिनसले असावे आणि त्यानंतर तक्रारदार व्यक्ती यांनी गणेश वाघ याला कारवाईत अडकवले असा अंदाज आहे .
सदर प्रकरणात अमित गायकवाड हा प्राथमिक दृष्ट्या मोहरा असल्याची माहिती असून अमित गायकवाड याचा देखील यात नक्की किती हिस्सा होता याचाही सध्या तपास यंत्रणा शोध घेत आहे. अमित गायकवाड यांच्या राहत्या घरात कुठलीही रोकड आढळून आली नाही. सात वर्षांपूर्वी तो एमआयडीसीमध्ये रुजू झालेला होता. सात वर्षात आपण कधीही लाच घेतली नाही असा देखील दावा तो करत असून त्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे याचाही कसून तपास सुरू आहे.