‘ माझ्यावर कारवाई का केली तुम्हाला अँटी करप्शनमध्ये घालवीन ‘ अशी धमकी देत एका वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला काठीने मारहाण केली असून आरोपीने त्यानंतर तलाठी जप्त करून घेऊन जात असलेला वाळूचा डंपर पळून नेलेला आहे . कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी इथे ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना मिळालेली होती त्यानंतर तहसील कार्यालय कोपरगाव येथील पथकाने पकडलेला वाळू चोरीचा नंबर नसलेला डंपर कोपरगाव तहसील कार्यालय येथे घेऊन जात असताना गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास जेऊर कुंभारी शिवारात स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये आरोपी राजू शेख व इतर अनोळखी इसम यांनी येऊन डंपर थांबवला.
आरोपी राजू शेख याने फिर्यादी तलाठी प्रवीण डहाके यांना काठीने उजव्या पायावर आणि उजव्या हातावर मारहाण करून दुखापत केली . आरोपीने त्यानंतर डंपरमधील वाळू रस्त्यात ओतून दिली आणि डंपर घेऊन तेथून पलायन केले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तलाठी प्रवीण डहाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू शेख यांच्यासोबत अनोळखी चालक आणि इतर तीन जण यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.