
अहमदनगर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना संगमनेर इथे समोर आलेली होती. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैदी फिल्मी स्टाईलने गज कापून फरार झालेले होते . फरार झालेल्या चारही जणांना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेळगाव इथून अटक करण्यात आलेली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुगावा लागला आणि त्यानंतर तात्काळ ही कारवाई करण्यात आली.
अहमदनगर पोलिसांनी त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी कंबर कसली आणि स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त सूत्रांच्या माध्यमातून माहिती काढली त्यावेळी फरार झालेल्या चारही जणांची चारचाकी गाडी जामनेरजवळ खराब झाल्याची माहिती समोर आली . जामनेर जवळ शेळगाव शिवारात एका शेतामध्ये आरोपी बसलेले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली आणि त्यानंतर जामनेर पोलिसांच्या मदतीने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले . फरार झालेल्या चारही कैद्यांना मदत करणारे मोहनलाल ताजी भाटी ( वडगाव शेरी पुणे ), अल्ताफ असिफ शेख ( पुणे ) यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
आठ तारखेला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली होती. संगमनेर तहसील कार्यालय परिसरात शहर पोलीस ठाणे याला लागून कारागृह आहे. बराक क्रमांक तीनमध्ये चारही आरोपी होते. त्यांनी कारागृहाचे गज कापून पलायन केले. सदर बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते एका चारचाकी वाहनातून पळून गेले होते त्यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे .