राहुरी तालुक्यातील गुहामध्ये दोन गटात तणाव , सुदैवाने परिस्थिती नियंत्रणात

शेअर करा

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात गुहा इथे कानिफनाथ मंदिर परिसरात दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर काही पुजारी आणि भक्तांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ मंदिराचा वाद अनेक दिवसांचा असून मुस्लिम समाजाकडून इथे दर्गा असल्याचा दावा केला जातो तर हिंदू समाजाकडून कानिफनाथ मंदिर म्हणून या ठिकाणाची पूजा अनेक वर्षांपासून केली जाते .

सदर प्रकरण सध्या न्यायालयात असतानाच पुजाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे . कानिफनाथ मंदिर परिसरात हिंदू बांधवांकडून अमावस्येला भजन आणि पूजाअर्चा केली जाते. त्यासाठी आलेल्या काही पुजारी आणि भक्तांना दुसऱ्या गटाकडून मारहाण करण्यात आली. मंदिराच्या शेजारी असलेली अनधिकृत मशीद सील करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

कानिफनाथ मंदिराच्या नावाने असलेली चाळीस एकर जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि त्यानंतर कागदोपत्री मंदिराचा उल्लेख हटवून चक्क एका दर्ग्याचा उल्लेख करण्यात आला असा दावा एका गटाकडून केला जात आहे . न्यायालयाचा कुठलाही निकाल येण्याच्या आधीच हा प्रकार घडला असल्याकारणाने आतापर्यंत एकोप्याचे उदाहरण ठरलेल्या गावांमध्ये देखील असे प्रकार दुर्दैवाने समोर येऊ लागले आहेत.


शेअर करा