
नगर शहरातील मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजी करण करण्याचे काम पीपल फॉर ॲनिमल ही संस्था करत असून काही दिवसाचा गॅप पडल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेने मेहेरबान होत हे काम पीपल फॉर ॲनिमल या संस्थेला दिलेले आहे. कुत्री पकडून त्यांचे निर्बीजी करण केले की त्यांच्या कानाला बिल्ला मारण्याचा नियम आहे मात्र बिल्ला मारलेली कुत्री शहरात कुठेही दिसून येत नाहीत त्यामुळे हे बिल्ले नक्की नगरकरांनाच मारले जात आहे का ? असा सवाल आता नगरकर उपस्थित करत आहेत . गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेकडून कुत्र्यांचे निर्बीजी करण या नावाखाली निधी देण्यात येतो मात्र प्रत्येक महिन्याला शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे ठेकेदार देत असलेली बिले आणि प्रत्यक्ष जमिनीवर असलेली परिस्थिती याचे कधीतरी महापालिका अधिकारी सर्वेक्षण करणार का ? असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे.
नगर शहरातील शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते विक्रम राठोड यांनी याआधी देखील श्वानाचे निर्बीजी करण प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप केलेला होता. पुन्हा एकदा महापालिकेने श्वानांचे निर्बीजी करण करण्याचे काम पीपल फॉर ॲनिमल या संस्थेला दिलेले आहे. कागदोपत्री एका कुत्र्यासाठी म्हणून महापालिका तब्बल 950 रुपये खर्च करते तर दुसरीकडे मोकाट कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर आतापर्यंत कुठलीही दंडात्मक कारवाई देखील कधी करण्यात आलेली नाही.
कमी कष्टात जास्त पुण्य मिळवण्याच्या उद्देशाने अनेक महाभाग परिसरातील मोकाट कुत्र्यांना खाऊ घालतात मात्र त्यामुळे मोकाट कुत्र्यांमध्ये मुबलक अन्न उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रजनन होऊन नागरिकांच्या देखील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. रात्री बारा एकनंतर काही व्यक्तींना घरी जाण्यासाठी अक्षरशः जीव मुठीत धरून जावे लागत आहे . एकीकडे अंधारलेले खराब रस्ते तर दुसरीकडे दबी धरून बसलेली कुत्र्यांची टोळकी नागरिकाचे जगणे अवघड करत आहेत .