धक्कादायक..पीएसआयच वापरतोय चक्क चोरीची दुचाकी , दुचाकी मालकासोबत मांडवली फिसकटली ?

शेअर करा

पोलीस म्हटल्यानंतर कायद्याचे पालन करणे हा नियम पोलिसांना देखील लागू आहे मात्र नियम धाब्यावर बसवून गुन्हे शाखेचा एक पोलिस उपनिरीक्षकच चोरीची मोपेड वापर असल्याची धक्कादायक माहिती नागपूरमध्ये समोर आली असून ह्या महाशयांच्या मोपेडनाम्याची नागपूर पोलिसात चांगलीच चर्चा आहे. नागपूर पोलिसांचे कारनामे याआधी देखील चर्चिले गेले आहेतच मात्र हा नवीन ‘ मोपेडनामा ‘ प्रथमच चर्चेत आलेला आहे . ( PSI is using a stolen bike in Nagpur )

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरातून एका विद्यार्थ्याने ॲक्टिवा चोरून नागपुरात आली. मोपेड चोरलेला तो चोरटा युवक नागपुरात शिक्षण घेत होता. तसेच चोरीची दुचाकी वापरत होता. गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाच्या पथकाने त्या युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याने पोलिसांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे त्याला खाक्या दाखवताच त्याने औरंगाबादमधील एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची माहिती दिली.

त्यानंतर एका पीएसआयने ती दुचाकी गुन्हे शाखेच्या युनिट कार्यालय किंवा पोलिस ठाण्यात जमा न करता थेट घरी नेली. घरी काय सांगितले हे त्याच्या जीवाला माहित मात्र पुढे पुढे चोरीच्या दुचाकीने तो अधिकारी अनेकदा ड्युटीवर यायला लागला. ही बाब पीएसआय पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. काही सहकाऱ्यांनी दुचाकी पोलिस ठाण्यात जमा करून स्वतःची सुटका करून घेण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने अधिकारी असल्याचे सांगून इतरांवरच दबाव आणला. आता ही मोपेड तो अधिकारी सोडणार की चालवणार हा ‘ प्रेस्टिज इश्यू ‘ झाला असून ह्या महाशयांच्या या मोपेडनाम्याची पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे.

चोरीची दुचाकी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पीएसआयने दुचाकीच्या मालकाला दिली. त्यानुसार तो पीएसआयला भेटायला नागपुरात आला. त्याने दुचाकीच्या बदल्यात काही पैशाची मागणी केली. मात्र, तेवढी रक्‍कम देण्यास नकार दिला. त्यामुळे पीएसआयनेही दुचाकी परत देण्यात नकार देत हाकलून लावल्याची चर्चा आहे. त्या अधिकाऱ्याने नंबर प्लेटमधील एक अक्षर ब्लेडने खोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रकरण अधिकच चर्चिले गेल्याने याची माहिती वरिष्ठांपर्यंत देखील पोहचली. ‘ गुन्हे शाखेचा कुणी अधिकारी चोरीची दुचाकी वापरतो याची खात्री करावी लागेल. त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. जर कुणी दोषी आढळल्यास आम्ही कुणाचीही खैर करणार नाही’ असे सुनील फुलारी,अतिरिक्त आयुक्त, गुन्हे शाखा यांनी सांगितले आहे.


शेअर करा