नगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा अद्भुत प्रकार समोर आलेला असून ॲल्युमिनियमच्या पट्ट्या उतरवल्यानंतर तीन लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या टेम्पो चालकाला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केलेली आहे. त्याच्याकडून तीन लाख रुपये देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , प्रतीक यशोदास कळकुंबे ( वय 25 वर्ष राहणार कानडे मळा सारसनगर ) असे अटक केलेल्या चालकाचे नाव असून त्याच्या विरोधात यशवंत सोन्याबापु धामणे ( राहणार सारसनगर ) यांनी फिर्याद दिलेली आहे.
फिर्यादी व्यक्ती यांचे ॲल्युमिनियम पट्ट्या विक्रीचे दुकान असून टेम्पोचालक प्रतीक नियमितपणे टेम्पोमध्ये मटेरियल टाकून 31 तारखेला शेवगावला गेलेला होता. तिथे पट्ट्या उतरवल्यानंतर दुकानदाराने दिलेले तीन लाख रुपये त्याने स्वतःकडे घेतले आणि त्यानंतर तो फरार झाला. धामणे यांनी त्यानंतर कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाला सुरुवात केली त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अकोले तालुक्यातील राजुर परिसरात असल्याची माहिती हाती आली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी दोन लाख 97 हजार रुपये मुद्देमाल आणि टेम्पो जप्त केलेला असून सदर कारवाई सहाय्यक फौजदार मनोहर गोसावी , देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले यांच्या पथकाने केलेली आहे.