
महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना बीड जिल्ह्यातील कडा परिसरात समोर आलेली असून तीन गुंठे जमीन विकल्यानंतर आर्थिक देवाण-घेवाणीतून बाप लेकाचा वाद वाढला आणि त्यानंतर संतापाच्या भरात मुलाने बापाचा गळा आवळून खून केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह गाडीत ठेवून आरोपीने जेवणावर ताव मारला आणि त्यानंतर मृतदेह मित्राच्या मदतीने तलावात फेकून दिलेला होता. सहा नोव्हेंबर रोजी आरोपी मुलासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आष्टी तालुक्यातील धानोरा इथे लक्ष्मण सदाशिव शेंडे ( वय 55 वर्ष ) यांनी तीन गुंठे जमीन एका व्यक्तीला विकलेली होती. शेंडे यांच्या मुलाने या जमिनीचे पाच लाख रुपये रोख घेतले तर तीन लाख रुपये समोरील व्यक्तीकडून येणे बाकी होते. शेंडे यांचा मुलगा नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात मिरी माका इथे राहत होता आणि त्यानंतर त्याचे वडिलांसोबत वाद सुरू झाले.
अशोक लक्ष्मण शेंडे असे आरोपी मुलाचे नाव असून डिसेंबर 2022 मध्ये वडिलांना घेऊन मिरी माका इकडे जात असताना पैशावरून वडिलांसोबत वाद झाला म्हणून सावरगाव मायंबा परिसरात चालू गाडी त्याने थांबवली आणि वडिलांचा गळा आवळून खून केला. आरोपीने त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ज्याला जमीन विकली होती त्या रामवीर यादव याला किरण वाघमारे नावाच्या व्यक्तीसोबत बोलावले आणि तिघांनी मिळून धानोरा इथे हॉटेलवर दारू ढोसली आणि मृतदेह उंदरखेल तलावात फेकून दिलेला होता.
6 एप्रिल 2022 रोजी लक्ष्मण शेंडे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अशोक लक्ष्मण शेंडे ( वय 38 वर्ष राहणार धानोरा तालुका आष्टी सध्या राहणार मिरी माका तालुका नेवासा ), दुसरा आरोपी रामवीर यादव आणि किरण वाघमारे ( दोघेही जण राहणार धानोरा तालुका आष्टी ) यांना अटक केलेली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे .