
अहमदनगर एमआयडीसी येथील बहुचर्चीत एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी नागापूर एमआयडीसीच्या बांधकाम विभागात फरार असलेला तत्कालीन उपाभियंता गणेश वाघ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक येथून 14 तारखेला अटक केलेली आहे. सहा दिवस त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे .
अहमदनगर एमआयडीसी येथील बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला एका ठेकेदाराकडून एक कोटी रुपयांची लाच घेताना शेंडी बायपास चौकात पकडण्यात आलेले होते. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई शुक्रवारी तीन तारखेला केलेली होती. आरोपी अमित गायकवाड याने त्यानंतर तत्कालीन उपाभियंता असलेला वाघ याला फोन केलेला होता. वाघ यास या प्रकरणाची कुणकुण लागली आणि त्यानंतर तो कुटुंबीयांसोबत पसार झालेला होता.
पोलिसांनी त्याचे पुण्यातील धुळ्यातील आणि बुलढाण्यातील घर तात्काळ झाडाझडती करून सील केले तसेच एअरपोर्टला अलर्ट राहण्याचे आदेश होते याच दरम्यान बुधवारी वाघ हा नाशिकला आला. गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्याला अटक करून नगर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलेले होते. सहा दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आलेली असून त्याचे हस्ताक्षर तसेच आवाजाचे नमुने घेण्यात आलेले आहेत. गणेश वाघ हा ताब्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचून आणखीन वाटेकरी किती आहेत ? याचा देखील तपास सध्या सुरू असल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील ठेकेदाराने मुळा धरणापासून नागापूर एमआयडीसीपर्यंत जलवाहिनीचे काम घेतलेले होते त्यातील दोन कोटी 66 लाख रुपयांचे बिल येणे बाकी असल्याकारणाने ठेकेदाराकडे अमित गायकवाड याने लाचेची मागणी केलेली होती त्यानंतर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक कोटी रुपयांची लाच घेताना अमित गायकवाड याला पकडलेले होते. आरोपी गणेश वाघ हा आधी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होता तेव्हापासून तक्रारदार व्यक्ती याच्यासोबत त्याचे आर्थिक हितसंबंध असल्याची देखील चर्चा आहे. आर्थिक देवाण-घेवाण फिस्कटल्याने यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एंट्री झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.