मयत भावाच्या जागेवर ‘ तोतया ‘ उभा करून .., राहुरीत प्रकार उघडकीस

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा अद्भुत प्रकार राहुरीत समोर आलेला असून मयत झालेल्या भावाच्या जागेवर दुसरा भाऊ उभा करून जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली. सदर प्रकरणी जमीन विक्री करणारा खरेदी घेणारा आणि व्यवहाराला साक्षीदार आणि ओळख देणारा यांच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सीमा रोहिदास धस ( मूळ राहणार नवी मुंबई ) यांनी एक वर्षांपूर्वी राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालय आणि पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल केलेला होता. राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड इथे 33 गुंठे जमीन ही मयत भानुदास रखमाजी धस यांच्या नावावर होती. भानुदास रखमाजी धस हे सात जुलै 2005 रोजी नवी मुंबईत मयत झालेले होते.

आरोपी व्यक्ती असलेला रामदास रखमाजी धस याने 31 जानेवारी 2011 रोजी राहुरी उपनिबंधक कार्यालयात ठकसेन नरहरी कांबळे ( राहणार पिंपरी अवघड तालुका राहुरी ) यांच्यासोबत हजर राहून खरेदी करून दिली. खरेदीच्या वेळी रामदास रखमाजी धस याने आपण भानुदास रखमाजी धस आहोत असे भासवले सोबतच विजय बाळकृष्ण कांबळे आणि अशोक महादेव पिंगळे या दोघांनी ओळख देखील पटवली. खरेदी खताला साक्षीदार म्हणून विनायक ठकसेन कांबळे ( राहणार पिंपरी अवघड ) आणि दुसरा साक्षीदार सुभाष तुकाराम गायकवाड यांनी देखील खरेदी खतावर सह्या केल्या.

अर्जाची चौकशी झाल्यानंतर सर्व आरोपींनी संगणमत करून मयत भावाच्या जागेवर जिवंत असलेला दुसरा भाऊ उभा करून खरेदीखत करून दिले आणि शासनासोबतच इतर व्यक्तींची देखील फसवणूक केली हे निष्पन्न झालेले आहे. उपनिबंधक प्रवीण पोपटराव कणसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिलेली असून आरोपी ठकसेन नरहरी कांबळे , रामदास धस , विजय बाळकृष्ण कांबळे , अशोक माधवराव पिंगळे , विनायक ठकसेन कांबळे, सुभाष तुकाराम गायकवाड या सर्व जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा