मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्या प्रकरणी नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . नगर तालुक्यातील शेंडी गावची सरपंच असलेल्या महिलेने शेंडी पोखर्डी वार्ता व्हाट्सअप ग्रुप वर मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत कमेंट केलेली होती. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास शेंडी गावात एक निषेध सभा घेण्यात आली आणि महिलेच्या या भूमिकेचा समस्त गावकऱ्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला . आरोपी महिलेचा एकमुखी निषेध म्हणून संपूर्ण शेंडी गाव आज बंद ठेवण्यात आलेले होते . आरोपी महिला ओबीसी समाजाची असून ओबीसी बांधवांनी देखील महिलेच्या भूमिकेचा एकमुखी निषेध केलेला आहे .
ह भ प अजय बारस्कर महाराज यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधताना खरोखरच जर छगन भुजबळ माळी समाजाचे नेते असते तर त्यांनी भुजबळ नॉलेज सिटी ऐवजी महात्मा फुले नॉलेज सिटी काढली असती असे म्हटलेले आहे. माळी समाजाचे खरे नेते जर कोणी असेल तर ते फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपणारे खासदार अमोल कोल्हे आहेत , असे देखील ते पुढे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या सोयाबीन चिल्ली विकणाऱ्या महिलेला देखील त्यांनी माफी मागण्याचा इशारा दिलेला आहे. ग्रामसभेच्या ठरावानंतर या महिलेचे सरपंचपद कायमचे रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी एकवटण्याची गरज असल्याचे मत बारस्कर महाराज यांनी व्यक्त केलेले आहे.
आरोपी महिला उपजीविकेचे साधन म्हणून गुलमोहर रोड पोलीस चौकीजवळ सोयाबीन चिल्लीची गाडी चालवत असल्याची देखील माहिती आहे .शेंडी पोखर्डी वार्ता ग्रुप वर १८ तारखेला संध्याकाळी सहाच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी कोण आहे ? असा प्रश्न एका व्यक्तीने विचारला होता त्यावर उत्तर देताना आरोपी महिलेने मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीत उत्तर दिले . मराठा बांधवांच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या म्हणून सर्व एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी सिताराम दाणी यांनी फिर्याद दिलेली आहे.
फिर्यादीमध्ये म्हटल्याप्रमाणे , सिताराम दाणी हे 18 तारखेला संध्याकाळी घरी असताना त्यांचा भाचा असलेला अक्षय भगत याने शेंडी पोखर्डी वार्ता या व्हाट्सअप ग्रुपवर आरोपी महिलेने केलेली कमेंट फिर्यादी यांना दाखवली. महिलेची ही कमेंट वाचल्यानंतर आपल्या सोबतच आपल्या समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत असा आरोप करत शेंडी गावातील ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेतलेली होती. एमआयडीसी पोलिसांनी त्यानंतर परिस्थितीचे भान ठेवत तात्काळ आरोपी महिलेच्या विरोधात कलम 505 2 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून पुरावा म्हणून महिलेने केलेल्या कमेंटचे स्क्रीन शॉट पोलिसात सादर करण्यात आलेले आहेत.
गावातील एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने सर्व समाज बांधवांनी त्यानंतर शेंडीतील दत्त मंदिरासमोर सभा घेतली त्यामध्ये या महिलेच्या भूमिकेचा कडक शब्दात निषेध करण्यात आला. महिलेच्या भूमिकेचा निषेध म्हणून आज शेंडी गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला होता. गावात कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवलेला आहे . मराठा बांधवांनी देखील संयमाची भूमिका बाळगत कुठल्याही पद्धतीने कायदा हातात न घेण्याचे आश्वासन पोलिसांना दिलेले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.