मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे मात्र सरकार वरील दबाव वाढवण्यासाठी 1 डिसेंबरपासून मराठा समाजाने ‘ गाव तिथे उपोषण ‘ आंदोलन सुरू करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी महाड येथील शिवाजी चौकातील सभेत केलेले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की , ‘ मराठा समाज हा कुणबी असल्याचे पुरावे गेली 70 वर्ष लपवून ठेवण्यात आलेले होते. मराठा समाजाने देखील पुरावा नसल्याच्या दाव्यावर विश्वास ठेवला आणि सात पिढ्यांचे नुकसान करून घेतले. आता कुठे पुरावे सापडू लागले आहेत मग ते कुणी लपवले होते , पुरावे लपवणाऱ्यांची नावे देखील जाहीर करण्यात यावीत ‘, असे देखील त्यांनी म्हटले आहे .
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की , ‘ आरक्षणाचा विषय 70% मार्गी लागलेला आहे. हा विजय केवळ माझा किंवा तुमचा नाही मी केवळ एक निमित्त आहे मात्र समाज एकवटला म्हणून हे यश मिळालेले आहे . राजकारण जरूर करा पण त्याआधी आपल्या लेकरा बाळांचे भविष्य सुरक्षित करा. मराठा आरक्षणासाठीचा हा पहिला आणि शेवटचा लढा आहे त्यामुळे संयमाने परिस्थितीला सामोरे जा ‘
छगन भुजबळ यांच्यावर देखील त्यांनी नाव न घेता टीका केलेली असून म्हणाले की , ‘ ते म्हातारे झालेले आहेत. त्यांची वयोमानानुसार विचारशक्ती गेलेली आहे त्यांना सध्या राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ‘, असे देखील ते पुढे म्हणाले .