आयुक्तसाहेब..’ भावी विद्यमान अन शुभेच्छाधारी ‘ नेत्यांना आवरा , गल्लीचे नेते दिल्लीच्या थाटात

शेअर करा

नगर शहरात आणि उपनगरात सध्या फ्लेक्सबाजांनी धुमाकूळ घातलेला असून सुरुवातीला गणेशोत्सव त्यानंतर नवरात्र त्यानंतर दिवाळी आणि त्याही पुढे जात वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे वाढदिवस असे केवळ निमित्त साधून रंगीबेरंगी फ्लेक्स शहरात सध्या ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत . जानेवारी 2017 मध्ये न्यायालयाने आदेश करून राज्यभर राजकीय नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या फलकबाजीला आळा घालावा असे निर्देश केलेले होते मात्र त्या आदेशाची सतत पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे .

फ्लेक्स बाजांना आळा घालण्यासाठी महापालिका तसेच नगरपालिका यांच्याकडून कुठलीही पाऊले उचलली जात नसल्याने न्यायालयाचाच अवमान केला जात आहे अशी याचिका उच्च न्यायालयाकडे दाखल करण्यात आलेली होती.राज्य सरकारच्याच वकिलांनी नागरिकांमध्ये जागरूकता नाही असा दावा न्यायालयात केला मात्र धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून नगरपालिका आणि महापालिका प्रशासन कुठलेही प्रयत्न करत नाही उलट सत्ताधारी नेत्यांचे फ्लेक्स लावलेले दिसले की डोके झाकण्याचे सोंग घेण्यात येते .

फ्लेक्स बनवणे नवीन तंत्रज्ञानामुळे खूप सोपे झालेले असून डायरेक्ट प्रिंट घेऊन नेत्यांचे चकाचक चेहरे चौकाचौकात झळकत असल्याने गल्लीत देखील ज्यांना कोणी ओळखत नाही असे चेहरे राष्ट्रीय स्तरावरील नेते असल्याच्या थाटात नगरकरांना पाहायला मिळत आहेत. अहमदनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीने तसेच राजकीय पक्षात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या नेत्यांची हुजरेगिरी करण्यासाठी असे प्रकार शहरभर सुरु आहेत .

नगर शहरातील प्रत्येक चौकात असे विनापरवाना फलक दिसत असून अनेक ठिकाणी त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत तसेच काही ठिकाणी तर वाहतुकीचे दिवे देखील दिसून येत नाहीत. महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक अशा गोष्टींकडे डोळेझाक करत आहे. त्यांचे फ्लेक्स काढले तर आम्हाला ते त्रास देतील या भावनेतून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी देखील कारवाईची हिंमत दाखवत नाहीत. अहमदनगर महापालिका देखील सध्या डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराप्रमाणे अशा फ्लेक्सकडे दुर्लक्ष करत असून अशा ‘ भावी आगामी अन शुभेच्छाधारी ‘ नेत्यांना कुणीतरी आवरण्याची गरज आहे असे नागरिक बोलताना दिसून येत आहेत .


शेअर करा