खाकीला सलाम..स्वतःचा विचार न करता वाचवले तरुणीचे प्राण

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या अमरावती येथील एका बीट मार्शल अधिकाऱ्याची जोरदार चर्चा सुरू असून तब्बल वीस फूट उंच पुलावरून आंबा नाल्यात उडी घेऊन त्यांनी एका तरुणीचे प्राण वाचवले आहेत . तिला नाल्याबाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांनी दाखल केलेले असून 20 नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारासची ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्रमोद सायरे असे बीट मार्शल अधिकाऱ्याचे नाव असून नेहमीप्रमाणे ते राजापेठ ठाण्यातील गस्तीवर असताना दुपारी बाराच्या सुमारास अमरावती बडनेरा मार्गावरील पुलावरून एका तरुणीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने नाल्यात उडी घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. तरुणीला वाचवण्यासाठी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वीस फूट उंच नाल्यात उडी घेतली.

प्रमोद यांनी तात्काळ या तरुणीला नाल्याबाहेर काढले आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरुणी ही गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असून तिने इतका टोकाचा निर्णय का घेतलेला होता ? याबाबत माहिती अद्यापसमोर आलेली नाही. तरुणीसाठी देवदूत बनून आलेले बीट मार्शल प्रमोद सायरे यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.


शेअर करा