मराठा आरक्षणासाठी आणखीन एका तरुणाचे टोकाचे पाऊल , शेतात म्हणून गेला अन.

शेअर करा

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली असून दुर्दैवाने मराठा तरुणांच्या आत्महतेच्या बातम्या देखील रोज समोर येत आहेत. असाच एक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दिग्रस कोंढुर येथे समोर आलेला असून एका 21 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कयाधू नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. एक तारखेला शुक्रवारी ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अमरदास संजय सूर्यवंशी ( वय 21 वर्ष ) असे मयत तरुणाचे नाव असून अमरदास सूर्यवंशी हा शेतकरी होता. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देखील त्याने सक्रिय सहभाग आंदोलनामध्ये घेतलेला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याकारणाने तो अस्वस्थ झालेला होता त्याच्या पाठीमागे आई-वडील भाऊ असे कुटुंबीय आहे.

एक तारखेला सकाळी दहाच्या सुमारास तो शेताकडे जातो असे सांगून निघून गेलेला होता मात्र तो शेतात पोहोचला नाही आणि कयाधू नदीच्या पात्रात त्याने उडी मारून आत्महत्या केली. दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आलेला असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढले. त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आलेली असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण आत्महत्या करत आहोत असे त्याने या सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे. बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींवार यांनी घटनास्थळी भेट दिली .


शेअर करा