“भारतातील गरीब भुकेला आहे कारण…,” राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा : पहा काय म्हणाले ?

शेअर करा

जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत ९४ व्या स्थानी पोहोचला आहे. नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. २०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या यादीत १०२ व्या क्रमांकावर असणारा भारत यावेळी १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या स्थानी आहे.

जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षाही मागे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भारतातील गरीब भुकेला आहे कारण सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे”.

देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना ० ते १०० असे गुण दिले जातात. त्यानुसार त्यांची क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये ० गुण हे सर्वोत्तम समजले जातात, याचा अर्थ एकप्रकारे त्या देशात भुकेची स्थिती काळजी करण्यासारखी नाही असाच होतो. भारताला ५० पैकी २७.२ गुण देण्यात आले असून परिस्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जागतिक कुपोषण निर्देशांक अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसंच ‘वेल्ट हंगर हिल्फी’ ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात. जगभरातील स्थिती मध्यम असल्याचा उल्लेख जागतिक कुपोषण निर्देशांकात करण्यात आला असून जगभरातील ६० कोटींहून अधिक लोक कुपोषित असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

९.९ पेक्षा कमी गुण असल्यास परिस्थिती गंभीर नाही. १० ते १९.९ मध्ये गुण असल्यास परिस्थिती मध्यम आहे. २० ते ३४.९ गुण असल्यास भुकेची परिस्थिती गंभीर आहे. ३५ ते ३९.९ गुण म्हणजे धोक्याची घंटा तर ५० हून अधिक गुण म्हणजे धोका खूप वाढला असून परिस्थिती भयावह आहे असा अर्थ होतो. २०२० मधील भारताची कामगिरी तुलनेत सुधारली आहे. भारताला २७.२ गुण असून २००० मध्ये ३८.९, २००६ मध्ये ३७.५, २०१२ मध्ये २९.३ गुण होते.


शेअर करा