कागदोपत्री मयत व्यक्तीसोबत नगर चौफेर प्रतिनिधीची ‘ ग्रेट भेट ‘, नगर जिल्ह्यातील घटना

शेअर करा

आपण ज्या व्यक्तीला पाहताय त्या व्यक्तीचे नाव आहे किशोर त्रिंबक वाघमारे . नगर तालुक्यातील जेऊर येथील ते रहिवासी असून कागदोपत्री ते एक वर्षांपूर्वीच मयत झालेले आहेत . त्यांची आणि त्यांच्या हयात असलेल्या बहिणीची जमीन एका व्यक्तीने दोघेही मयत असल्याचे दाखवत हडप केलेली आहे . नगर चौफेर प्रतिनिधी सोबत त्यांनी संवाद साधलेला असून आपली व्यथा माध्यमासमोर मांडलेली आहे . विशेष म्हणजे दोघांच्याही मृत्यूचे दाखले त्यांनी यावेळी प्रतिनिधीला दाखवले असून दोषी व्यक्तींवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची देखील त्यांनी दलित महासंघाचे संजय चांदणे यांच्यासोबत भेट घेतलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार , किशोर त्रिंबक वाघमारे आणि त्यांच्या बहिण असलेल्या सरिता विलास काळोखे यांच्या नावावर पूर्वीपासून वर्ग दोनची जमीन नेवासा खुर्द येथे होती . किशोर वाघमारे यांना मुलीचा विवाह करण्यासाठी पैशाची गरज होती म्हणून त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे घेऊन मुलीचे लग्न केले मात्र त्यानंतर हे पैसे परत करण्यासाठी नेवासा येथील शेती गहाण ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला . जमीन वर्ग दोनची असल्याकारणाने त्यांना अडचणी यामुळे येऊ लागल्या.

नेवासा तालुक्यातील खडका येथील रहिवासी असलेला युनूस देशमुख याने त्यांना पैसे देण्याची तयारी दाखवली मात्र शेती गहाण न ठेवता तुम्ही मृत्युपत्र करून द्या असे युनुस याने सांगितले आणि स्वतःची बायको सायराबानू हिच्या नावावर दोन्ही बहीण भावांची मृत्युपत्रे बनवून घेतली. मृत्युपत्र बनवून घेतल्यानंतर वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व पैसे परत केलेले आहेत मात्र त्यानंतर आमच्या शेतात गेल्यानंतर युनूस देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाने वाघमारे यांना मारहाण केली. किशोर वाघमारे यांनी त्यानंतर शेतजमिनीचा सातबारा काढला त्यावेळी त्यावरून सायराबानू युनूस देशमुख हिच्या नावावर ही शेती झाल्याचे समोर आले.

धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर वाघमारे यांनी शेत जमिनीविषयीची इतर कागदपत्रे मिळवली त्यामध्ये चक्क ते स्वतः किशोर त्रिंबक वाघमारे आणि त्यांची बहीण सरिता विलास काळोखे हे कागदोपत्री मयत झाल्याचा अहवाल त्यांना मिळाला . किशोर वाघमारे यांचा दिनांक 20 /11/2022 रोजी मृत्यू झाला तर सरिता काळोखे यांचा 20.1.2023 रोजी मृत्यू झाला असे मृत्यूचे अहवाल देखील सध्या त्यांच्या जवळ आज रोजी आहेत. कुठल्याही पद्धतीच्या दाखल्याची तलाठी यांनी नोंद लावतेवेळी चौकशी केली नाही त्यानंतर ही जमीन युनूस देशमुख याची पत्नी सायरा बानू देशमुख हिच्या नावावर करण्यात आली.

सदर प्रकरणी युनूस देशमुख त्याला साथ देणारे , खोटा मृत्यूचा अहवाल देणारे डॉक्टर , तलाठी , मंडल अधिकारी आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी पैसे खाऊन आरोपींना साथ दिली असा आरोप किशोर वाघमारे यांनी केलेला असून शेतजमीन पुन्हा आमच्या नावावर करण्यात आली नाही तर आम्ही आगामी काळात संघर्ष तीव्र करू असा इशारा दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांची देखील त्यांनी दलित महासंघाचे संजय शिवाजी चांदणे यांच्यासोबत भेट घेतलेली असून आगामी काळात या मुद्द्यावरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संजय शिवाजी चांदणे यांनी दिलेला आहे .


शेअर करा