तपोवन रोडवरचा भाजीबाजार हटवा , श्रीनिवास बोज्जा यांची आयुक्तांकडे मागणी

शेअर करा

नगर शहरातील सावेडी उपनगरातील प्रति पाईपलाईन रोड म्हणून ओळख असलेल्या तपोवन रोडची रुंदी पाईपलाईन रोडच्या तुलनेत अत्यंत कमी आहे अशा परिस्थितीत देखील तपोवन रोडवर भाजी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे . सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे हा भाजी बाजार हटवण्याची मागणी केलेली आहे.

श्रीनिवास बोज्जा यांनी याप्रकरणी माहिती देताना , ‘ तपोवन रोडवरील भाजी मार्केट हे भर रस्त्यावर असल्याकारणाने भाजी खरेदी करणाऱ्यापेक्षा भाजी विक्रीस बसणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाच आज रोजी धोका आहे . मनमाड रोड आणि औरंगाबाद रोड या दोन मुख्य रस्त्यांना जोडणारा हा रस्ता असून मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर जड वाहतूकदेखील सुरू असते आणि गाड्यांचा वेग जास्त असतो त्यामुळे नागरिकाचा किंवा भाजी विक्रेताचा जीव जाण्याअगोदर महापालिका आयुक्त यांनी भाजी बाजार हटवावा आणि त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी , ‘ असे म्हटलेले आहे.

नगर शहरात भर रस्त्यावर भरणारे भाजी बाजार ही मोठ्या प्रमाणात डोकेदुखी असून अशाच स्वरूपाचे भाजी बाजार शहरातील एकविरा चौक ते पारिजात कॉर्नर , तपोवन रोड , नागापूर रोड या ठिकाणी भरत आहेत . शहरातील रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता कुठल्याही क्षणी खड्डा चुकवण्याच्या नादात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही राजकीय व्यक्ती यामध्ये लुडबुड करत असून एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येते का ? असा देखील संताप सध्या नागरिक व्यक्त करत आहेत .


शेअर करा