
नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून लग्नाला नकार दिल्यानंतर एका युवतीच्या होणाऱ्या पतीच्या इंस्टाग्राम खात्यावर तिचा मॉर्फ केलेला फोटो पाठवून तिची बदनामी करण्यात आली आणि त्यानंतर तिचा साखरपुडा मोडला. 16 नोव्हेंबर रोजी हा प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील आणि सध्या पुणे इथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत घडलेला आहे . पुण्यातील वानवडी पोलिसात याप्रकरणी एका आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तेजस माळशिकारे ( राहणार चौरसावंगी तालुका श्रीगोंदा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गुन्हा नगर शहरात घडला असल्याकारणाने शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे . फिर्यादी तरुणी श्रीगोंदा तालुक्यातील एका मेडिकलवर प्रॅक्टिस करत असताना तिची तेजस याच्यासोबत ओळख झालेली होती.
डिसेंबर 2022 मध्ये नगरला तरुणी शिक्षण घेण्यासाठी आली त्यावेळी तेजस हा शहरात आला आणि त्याने तिला चांदबिबी महाल आणि दिल्लीगेट इथे फिरायला नेले . दोघांनी सोबत एकत्रित फोटो काढले आणि तेजस याने तिला अंगठी भेट देत लग्न करशील का ? असे देखील विचारले मात्र तरुणीने त्याला नकार दिलेला होता . तरुणी त्याला आपण फक्त मित्र आहोत असे सांगायची आणि वाद झाल्यावर तिने त्याचा नंबरही ब्लॉक करून टाकला.
आरोपी याने त्यानंतर तिला मी आजारी आहे आयसीयूमध्ये ऍडमिट आहे असे सांगत खोटे बोलून मानसिक त्रास दिला . युवती एक दिवस त्याला भेटण्यासाठी सिद्धीबाग इथे आलेली होती तेव्हा त्याने आधीचे फोटो दाखवले आणि ब्लॅकमेल करण्यास सुरू केले. तरुणीने त्याला विरोध केला मात्र त्याने तिला धडा शिकवेल अशी धमकी दिली. 16 नोव्हेंबर रोजी तिचा साखरपुडा असतानाच त्याने तिच्या होणाऱ्या पतीच्या इंस्टाग्रामवर तरुणीचा फोटो पाठवला आणि तिच्यासोबत लग्न करू नका असा मेसेज केला म्हणून तिचा साखरपुडा मोडला असे फिर्यादीत म्हटलेले आहे. सदर प्रकरणी सध्या तपास सुरू असल्याची माहिती आहे.