कोर्टाने आदेश करूनही ‘ लाच ‘ मागितली , तलाठी भाऊसाहेब आले जाळ्यात

शेअर करा

महाराष्ट्रात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार बीडमध्ये समोर आलेला असून मुलीच्या नावाने असलेली जमीन सुनेच्या नावाने करण्यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी लाच मागण्यात आली. वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी भाऊसाहेब याच्यासोबत एका खाजगी एजंटाला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे. पाटोदा तालुक्यातील वांजरा फाट्यावर ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार , प्रवीण संदीपान शिंदे आणि विशाल ठाकरे ( राहणार सुपा तालुका पाटोदा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून शिंदे हा सौताडा सज्जा गावाचा तलाठी आहे. आपले काम पाहण्यासाठी त्यांनी विशाल या खाजगी इसमाला नेमलेले होते. तक्रारदार व्यक्ती यांचा न्यायालयात वाद सुरू होता त्यानंतर दिवाणी न्यायालयाने प्रकरणात तडजोड करून ही जमीन तक्रारदाराच्या सुनेच्या नावाने करण्याचा आदेश केला मात्र तरीदेखील तलाठी याने लाच मागितली होती.

‘ न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपण कारवाई करू मुद्रांक शुल्क भरण्याची गरज पडणार नाही ‘ अशी हमी देत प्रवीण याने वीस हजार रुपये लाचेची मागणी केली. विशाल याने देखील त्याच्याशी सहमती दर्शवली आणि दोघेही लाच घेण्यासाठी वांजरा फाटा इथे आलेले होते. तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबर वर फोन करून यासंदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत पोलीस अधीक्षक संदीप आटोळे , अप्पर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे.


शेअर करा