तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा देणे पुण्यातील महिलेला पडले ‘ इतके ‘ महाग की … ?

  • by

तनिष्क या दागिन्यांच्या ब्रँडने तयार केलेल्या एका जाहिरातीवरुन देशभरात बराच कलह निर्माण झाला आहे. माफी मागून देखील अद्याप देखील त्याचे पडसाद उमटतच आहेत. तनिष्कच्या या जाहिरातीला पाठिंबा दर्शवणाऱ्या एका पुण्यातील महिलेला ऑनलाइन छळवणुकीला समोरं जावं लागलं आहे, त्यामुळे तिने पुणे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. Trollers insult Pune woman for supporting Tanishq’s advertisement

झारा परवाल असं या मुस्लिम महिलेचं नाव असून ती पुण्याची रहिवासी आहे. तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा दर्शवण्यासाठी तिने हिंदू पतीसोबतचा विवाहाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे पुढे तिला ऑनलाइन छळवणुकीला सामोर जावं लागलं. झारा यांचे पती हिंदू असून त्यांनी हिंदू पद्धतीने विवाह केला होता. त्यांच्या लग्नाच्या फोटोवर देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात आहे .

झारा यांनी तक्रार नोंदवतांना म्हटले आहे की, “तनिष्कच्या जाहिरातीतून देण्यात आलेल्या समाजिक संदेशाला आपला पाठिंबा आहे. मात्र, यामुळे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला शिविगाळ आणि धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे मी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. माझ्या लग्नाच्या फोटोवर ट्विटरवर सुमारे ४०,००० मेसेजेसद्वारे शिविगाळ केली जात आहे. यावरुन देशात खरोखरच बेरोजगारीने तीव्र स्वरुप धारण केल्याचं दिसतं. हे ऑनलाइन ट्रोलर्स माझ्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असून धमक्या देत आहेत”

उपद्रवी ट्रोलर्सनी झारा यांच्या घराचा पत्ता आणि फोन क्रमांक देखील सोशल मीडियावरुन लीक केला आहे. त्यामुळे त्या घाबरून गेल्या आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. चौकशीसाठी त्यांनी तात्काळ पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे स्वतःचे आणि कुटुंबियांचे ट्विटर आणि फेसबुक अकाउंटचे आयडी सोपवले. झारा ह्या पुण्यातील ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या (एआयपीसी) सचिव आहेत. त्यांचा काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास असून पुण्यात काँग्रेससाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. दरम्यान, या ट्रोलिंगप्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरुर आणि इतर काँग्रेस नेत्यांनी झारा यांना पाठिंबा दर्शवला आहे.

तनिष्कने आपल्या जाहिरातीतून लव्ह-जिहाद या कथीत प्रकाराचा प्रचार-प्रसार केल्याच मत सोशल मीडियातून व्यक्त करण्यात आलं होतं. त्यासाठी सोशल मीडियातून तनिष्कवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रमही राबवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर झालेल्या टीकेनंतर तनिष्कने आपली ही जाहिरात मागे घेतली होती. मात्र ट्रोलर्सच्या दबावाला बळी पडून तनिष्कने जाहिरात मागे घेतल्याबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती तर अंधभक्तांच्या ग्रुपवर असे आणखी विजय आपल्याला प्राप्त करायचे आहेत, अशा संदर्भात पोस्ट पाहायला मिळाल्या होत्या.