एकाच कुटुंबातील अल्पवयीन बहीण भावासह 4 जणांचा खून .. अखेर ‘ रहस्य ‘ उलगडले

शेअर करा

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून तिच्यासह चारही भावंडांची कुऱ्हाडीने वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. रक्षकच भक्षक बनल्याचे या प्रकारात स्पष्ट झाले असून मुलीच्या मोठ्या भावाच्या चार मित्रांनीच हा घृणास्पद प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे . धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीच्या आई वडील आणि भावाने आम्ही बाहेर जात असल्याचे सांगून घराकडे लक्ष ठेवा, असे सांगितले होते. आरोपीना घरचे बाहेर गेल्याची माहिती कळल्याने त्यांनी याचा फायदा घेतला . The mystery of the murder of four persons at Raver Borkheda in Jalgaon district has been revealed

परिस्थितीजन्य पुरावे आणि श्वानपथकाच्या मदतीने पोलीस संशयितांपर्यंत पोहचले असून पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुकेश संन्याल, राज उर्फ गुड्ड्या, सुनील सीताराम अशी संशयित आरोपींची नावे आहेत तर या तिघांसह एका अल्पवयीन आरोपीचा देखील या गुन्ह्यात सहभाग आहे. हत्याकांडाची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गावाला गेलेल्या मृतांच्या मोठ्या भावाला विचारपूस केली. त्याने घराकडे लक्ष ठेवण्यासाठी ज्या मित्रांना सांगितले होते, त्यांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घटनाक्रम उलगडला.

भिलाला कुटुंबीय मोठ्या मुलाला घेऊन मध्यप्रदेशातील आपल्या गढी या मूळगावी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते. बोरखेडा येथे घरी चारही मुले एकटी असल्याने, त्यांच्या मोठ्या भावाने काळजी म्हणून आपल्या चारही मित्रांना काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र नराधम मित्रांनी दारूच्या नशेत मध्यरात्री भिलाला यांच्या घरी जाऊन सुरुवातीला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यावेळी इतर तिघे भावंडे झोपेतून जागे झाले. त्यानंतर नराधमांनी पीडित मुलीसह चारही भावंडांच्या गळ्यावर कुर्‍हाडीने वार करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

दरम्यान, संशयित आरोपी अजूनही पोलीस तपासात काहीशी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. काही पुराव्यांचे संकलन केले जात असल्याने पोलिसांनी अजूनही या घटनेचा उलगडा झाल्याचे जाहीर केलेले नाही. नराधमांनी हत्याकांडात वापरलेली कुऱ्हाड, संशयितांचे रक्ताने माखलेले कपडे, घटनास्थळी मिळालेल्या देशी दारूच्या दोन बाटल्या अशा वस्तू जप्त केल्या आहेत.


शेअर करा