राष्ट्रवादी पुन्हा….राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ‘ त्या ‘ भाषणाची आज वर्षपूर्ती : : साताऱ्याचा व्हिडीओ पहा

  • by

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दिवसाची आज 18 ऑक्टोबरला वर्षपूर्ती . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा येथील भर पावसातील ती सभा राज्यातल्या जनतेला भावली आणि विधानसभा निवडणुकीचा नूरच पालटला. सत्तेची आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने अचानकपणे शिवसेनेला आपल्या बाजूला वळवून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली आणि भाजपचे ‘ मी पुन्हा येईन ‘ चे गर्वहरण झाले.

सातारा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा एक एक बुरुज ढासळत होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले या दोन्ही राजांना भाजपने पक्षात घेतले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा किल्ला राखण्यासाठी शरद पवार स्वतः रणांगणात उतरले. 1 वर्षापूर्वी 18 ऑक्टोबरला सातारा जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या भर पावसातील शरद पवार यांच्या सभेने महाराष्ट्रातील सर्व राजकीय समिकरणे बदलून टाकली.

शरद पवार यांच्या सभेपूर्वी याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्यानंतर शरद पवार काय बोलणार यावर पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. पाटणमधील सभा उरकून शरद पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवले आणि इतक्यात जोरदार पाऊस सुरू झाला, मात्र लोक जागचे हलले नाहीत. शरद पवार यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते. पवार बोलायला उभे राहिले आणि पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. समोर लोक भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरती छत्री बाजूला केली आम्ही धो-धो पावसात शरद पवार यांनी भाषणाला सुरवात केली. Sharad Pawar’s speech in the rain in Satara

” गतवेळी माझी चूक झाली ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे” असे भावनिक आवाहन शरद पवार यांनी केले आणि केवळ सातारात नव्हे तर पूर्ण राज्याचे राजकारण या सभेने पूर्णपणे बदलून टाकले. शरद पवार यांच्या सभेचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या सभेच्या वर्ष पूर्तीसाठी एका छोट्या सभेचे आयोजन केले आहे.