तुझं तर बायकोनं श्राद्ध घातलं होत की, तू जिवंत कसा ? आठ वर्षांनी पती पुन्हा परतला

  • by

आठ वर्षांपूर्वी अचानक पती घरातून गायब झाला होता. काही काळ घरच्यांनी देखील तो पुन्हा येण्याची वाट पाहिली मात्र अखेर त्यांची आशा मावळली.सदर व्यक्ती मृत झाला असेल असे समजून घरच्यांनी चक्क नातेवाईकांसमक्ष श्राद्ध घातलं, विधीही उरकले. तीन वर्षांची मुलगी, एक वर्षाचा मुलगा आणि पत्नीने नवरा आज येईल, उद्या येईल म्हणून वाटेकडे डोळे लावले होते. अशातच अचानकपणे तब्बल आठ वर्षांनी पती घरी परतला. घरातून निघून गेलेला नवरा अचानक 8 वर्षांनी परतला असून पत्नीसह सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. The husband returned eight years later satara district palghar

सातारा येथील यशोधन निवारा आश्रम केंद्रात काही दिवसांपूर्वी दलालाच्या तावडीतून सुटका केलेल्या 4 मनोरुग्णांना आणण्यात आले होते. तेथे आश्रमाचे संचालक रवी बोडके यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्यातील साजन (नाव बदललं आहे) हा मात्र शांत शांत राहत होता. दोन दिवसांनंतर त्याला विश्वासात घेऊन माहिती विचारण्यात आली, त्यावेळी त्याने पत्नी व मुलांची नावे सांगितली. तसेच पालघर जिल्ह्यातील मनोर तालुक्यात कोसबांड हे आपलं गाव असल्याचंही त्याने सांगितलं. त्यामुळे साजनला त्याच्या घरी सोडण्याचा निर्णय रवि बोडके यांनी घेतला.

साजन गावामध्ये पोहचताच गावच्या सरपंचानी ,’ अरे.. तुझं तर बायकोनं श्राद्ध घातलं होत की, तू जिवंत कसा.. ? ‘ असे विचारले. त्यांना देखील आश्चर्याचा सुखद असा धक्का बसला .सरपंचांसह साजनला घेऊन रवि बोडके साजनच्या घरी पोहोचले. त्यावेळी, घरात मुलगी अन् मुलगा होते. या सर्वांनी मुलीकडे पाहून तिला प्रश्न विचारला, ओळखलं का ?. मुलगी काही वेळ स्तब्ध झाली अन् तिने घरातील फोटोकडे पाहिले. त्यानंतर, बाबाssss म्हणत मुलीने मिठी मारली. मुलीच्या या मिठीनं साजनच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अन् घरातील सर्वांनाच मोठा आनंद झाला.