बातमी कामाची : तुमचे पैसे लुटण्याचा सायबर गुन्हेगारांचा ‘असा ‘ आहे नवीन फंडा

शेअर करा

तुमच्या खात्यावर पेटीएम द्वारे 6500 रुपये पाठवले आहेत ते मिळवण्यासाठी सोबतची लिंक डाऊनलोड करून घ्या आणि पैसे मिळवा असे मेसेज गेल्या कित्येक दिवसात महाराष्ट्रातील नागरिकांना येत असून ते मेसेज फसवणुकीचे आहेत. ती लिंक डाउनलोड केल्यास आपल्या खात्यावरील पैसे जाण्याचा धोका आहे. cyber criminals are using the name of Paytm to commit fraud

ऑनलाइन फसवणुकीचे नवीन नवीन फंडे वापरले जात आहेत. गेल्याच महिन्यात अशाच काही घटना घडल्या आहेत. पेटीएम वरून आयडियाच्या फोनवर बॅलन्स मारल्यावर पैसे मिळाले नाहीत . त्यांनी टोल नंबर वर तक्रार करा म्हणून सांगितले. टोल नंबरचा गुगल वर शोध घेतल्यानंतर तिथे फ्रॉड नंबर मिळाला व त्यावरून फोन केल्यावर एका व्यक्तीला तब्बल 14 हजाराचा गंडा बसला असल्याची घटना समोर आली होती.

मात्र आता पेटीएम वरून तुमच्या खात्यावर थेट पैसे जमा झाले आहेत, दिवसाला किमान एक ते दोन मेसेज तरी असे येत आहेत. ज्यांना या मेसेजमध्ये फारशी माहिती नाही ते लोक अशी आलेली त्यावर क्लिक करून काही सॉफ्टवेअर डाऊनलोड करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात मात्र हे करत असताना त्यांच्या बँक खात्याची माहिती लॉगिन पासवर्ड यासहित मोबाईलचे ओटीपी देखील सदर सॉफ्टवेअरवर इतरत्र कार्यरत असलेल्या गुन्हेगारांकडून वाचले जातात आणि आपले पैसे परस्पर लंपास केले जातात.

ज्या नंबर वरून हे मेसेज येतात त्यावर कॉल केल्यास फोन लागत नाहीत. आपल्याला जर कोणीच पैसे द्यायचे नसताना आपल्याला पेटीएम कडून पैसे आले तरी कसे ? असादेखील संभ्रम लोकांमध्ये निर्माण होतो. पेटीएम वरून पैसे जमा झाल्यास बँकेचा मेसेज येतो आणि पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात त्यासाठी कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नसते याची देखील माहिती सामान्य लोकांना नसते.

आर्थिक व्यवहार किंवा सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्तीस सदर गोष्टी बद्दल माहिती असते किंवा काहीजणांना अर्धवट माहिती असली तरी लालसेपोटी असे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून आपल्या मोबाईलची सिक्युरिटी आणि आर्थिक फसवणुकीला आमंत्रण दिले जाते. पैसे मिळाल्याचा उत्साह यांना स्वतःची बुद्धी गहाण ठेवण्यास भाग पाडतो आणि त्यातून त्यांची आर्थिक फसवणूक होते

सदर विषयावर अधिक बोलताना कोल्हापूर सायबर क्राईम शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई म्हणाले, ‘ हा लोकांना फसवण्याचा नवा फंडा आहे तुम्ही लिंक डाउनलोड केली की त्यांचे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होऊ शकते आणि त्यातून तुमची गोपनीय माहिती हॅक करून तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी एक किंवा दहा रुपये भरायला सांगितले जातात मात्र तसे केल्यास तुमच्या खात्यातील पाच-दहा हजारांना गंडा बसू शकतो त्यामुळे अशा मेसेज पासून सावध राहण्याची गरज आहे “

सायबर गुन्हेगारी मध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ओएलएक्स सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून तसेच पेटीएम, फोनपे किंवा गुगल पे याबद्दल लोकांमध्ये असलेल्या अज्ञानाचा फायदा घेत सायबर गुन्हेगार सोकावलेले आहेत. यातील बहुतांशी कनेक्शन गुन्हेगार हे राज्याबाहेरील असून कित्येकदा रक्कम लहान असल्याकारणाने पोलिसात हेलपाटे मारणे नको म्ह्णून बरेच लोक प्रकार सोडून देतात तक्रार करणे सोडून देतात त्यामुळे अशा गुन्हेगारांना कोणते भय राहत नाही.


शेअर करा