.. अन इतके दिवस तो पोलिसांशीच ‘ इलू इलू ‘ गप्पा मारत होता : पोलिसांचा जबरदस्त हनीट्रॅप

शेअर करा

पोलिसांना देखील कधी कधी ट्रॅक सोडून काम करावे लागते आणि बऱ्याच वेळा त्याचे रिझल्ट देखील झटपट येऊन जातात. अशीच एक घटना पुण्यात घडली असून पोलिसांनी चक्क फेक अकाऊंट बनवून चोराला आपल्या जाळ्यात ओढले आणि भेटायला बोलावून त्याला जेरबंद केले. घरातील दागिने घेऊन सदर चोरटा फरार झाला होता. पोलिसांनी फेसबुकवर मुलीच्या नावे त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि नंतर भेटायला बोलवले. सजून सवरून तो येताच त्याला धरण्यात आले. Sanghvi police in Pune caught the thief by creating a fake account on Facebook

उपलब्ध माहितीनुसार, संदीप भगवान हांडे (वय 25, सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे. मूळ रा. पिंपरखेडा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी संगीता अजित कांकरिया (52, रा. राजयोग बंगला, क्रांती चौक, कीर्ती नगर, नवी सांगवी) यांनी याबाबत 17 ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच्याकडून तब्बल 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड असा एकूण सहा लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सांगवी पोलिसांनी ही कामगिरी केली.

संदीप भगवान हांडे हा पूर्वी कांकरिया यांच्या घरी काम करत होता त्यावेळी त्याने फिर्यादी कांकरिया यांच्या घरातून 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना कांकरिया यांच्या घरी पूर्वी काम करणारा नोकर संदीप याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. मात्र तो कायम पत्ता बदलत असल्याने पोलिसांनी एक जबरदस्त शक्कल लढवली.

फेसबुकवर मुलीच्या नाव फेक अकाऊंट तयार करून पोलिसांनी संदीपला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट पाहून त्याने लगेच ती स्वीकारली. त्यानंतर काही दिवस पोलीस त्याच्याशी ‘रोमॅन्टिक चॅट’ करत त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत होते. गोड गोड ‘इलू इलू ‘ गप्पा मारल्यावर समोर तरुणीच आहे यावर त्याचा विश्वास बसला आणि तो भेटायला तयार झाला.

प्रेमाच्या आणाभाका देत पोलिसांनी त्याला ‘कपल पॉईंटला’ भेटण्यास बोलवले. त्यानुसार, संदीप मनाशी मोठी स्वप्न रंगवत मुलीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला अलगद ताब्यात घेतले.संदीपने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या पथकाने केली.


शेअर करा