वकील संरक्षण कायद्यासाठी आंदोलनाचा आज दहावा दिवस , बार असोसिएशनचा मोठा निर्णय

शेअर करा

वकील संरक्षण कायद्यासाठी नगर शहरातील जिल्हा न्यायालयासमोर 29 जानेवारीपासून धरणे आंदोलनाला बसलेल्या वकील बांधवांकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला असून 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील वकील नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जात आपले म्हणणे पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहेत. ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू झालाच पाहिजे ही एकमुखी मागणी राज्यभरात सध्या जोर पकडते आहे. 

9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा न्यायालयाच्या आवारात उपस्थित राहण्याचे आवाहन राज्यभरातील वकिलांना करण्यात आलेले असून वकील बांधवांच्या न्याय हक्कासाठी सर्व वकिलांना एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. वकील बंधू भगिनींचा महामोर्चा 9 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा न्यायालय इथून सकाळी 11 वाजता निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आलेली आहे . 

राहुरी येथील आढाव दाम्पत्याच्या हत्येनंतर वकील संरक्षण कायद्यासाठी 29 जानेवारीपासून जिल्हा न्यायालयासमोर धरणे आंदोलनाला बसलेल्या वकील बंधू भगिनींचे आंदोलन आज देखील सुरूच आहे. नगर चौफेर प्रतिनिधी सोबत बोलताना त्यांनी वकील संरक्षण कायद्याची गरज का आहे ? या संदर्भात आपले मत सविस्तरपणे मांडत 9 फेब्रुवारीपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.

नगर चौफेर प्रतिनिधीने आंदोलनासाठी बसलेल्या अनेक वकील बंधू-भगिनींसोबत चर्चा केलेली असून त्यांनी म्हटल्याप्रमाणे , ‘ आम्ही केवळ आरोपीची बाजू न्यायालयासमोर मांडण्याचे काम करतो. पुराव्यांच्या आधारे प्रकरण न्यायालयासमोर गेल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देऊन मग संबंधित व्यक्तीला गुन्हेगार ठरवते किंवा निर्दोष देखील ठरवते आणि न्यायालयाचा निर्णय मान्य नसेल तर संबंधित पक्षकार वरिष्ठ न्यायालयाकडे देखील जाऊ शकतात. एखाद्या आरोपीचे वकीलपत्र घेतले म्हणजे आम्ही वकील काही आरोपी किंवा गुन्हेगार होत नाहीत. आम्ही केवळ पक्षकाराची बाजू प्रामाणिकपणे न्यायालयासमोर घेऊन जात असतो

कित्येक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पक्षकार व्यक्तीला समोरील व्यक्तींकडून खोट्या गुन्ह्यात देखील अडकवले जाते आणि अनेक जणांवर यामध्ये अन्याय देखील होतो मात्र अशा व्यक्तींना देखील न्याय मिळवून देण्याचे देखील काम आम्ही करतो यावर कुणाचे लक्षच नाही. पोलिसांपेक्षा किंबहुना जास्त प्रमाणात अनेकदा गुन्हेगारी व्यक्तींशी आमचा संपर्क येत असतो. आमच्याकडे आलेले पक्षकार हे अनेकदा आमच्या परिचयाचे नसतात किंवा त्यांची पार्श्वभूमी देखील आम्हाला माहीत नसते. पक्षकारांच्या वाढत्या अपेक्षा न्यायालयीन मर्यादा असल्या कारणाने आम्ही अनेकदा पूर्ण करू शकत नाही आणि त्यातून गैरसमज आणि कायदा हातात घेण्याचे देखील प्रकार पक्षकारांकडून केले जातात .

वकील म्हणून आम्ही काम करत असलो तरी आम्हाला देखील कुटुंब आहे परिवार आहे मुलेबाळे आहेत. आमच्या घरी देखील वृद्ध आई-वडील आहेत . आम्हाला देखील आमचे घर आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून याआधी देखील अनेकदा वकिलांवर हल्ले झालेले आहेत आणि त्यांचे खून देखील झालेले आहेत . कुठवर आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत राहणार ? डॉक्टरांच्या संरक्षणासाठी सरकारने कायदा आणला मग वकिलांसाठी दुजाभाव का ? असा देखील सवाल वकील बांधवांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे.

वकील दांपत्याच्या अमानुष हत्येनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी वकील संरक्षण कायद्यासाठी वकील संघटना आक्रमक झालेल्या आहेत . अहमदनगर इथून या आंदोलनाची सुरुवात झालेली असून एका पक्षकाराने सहकाऱ्यांच्या मदतीने आढाव वकील दांपत्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह दगडाला बांधून विहिरीत फेकून दिलेले होते. सदर घटनेनंतर संपूर्ण राज्यात वकील बांधवांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले असून वकिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने एडवोकेट प्रोटेक्शन ऍक्ट बनवावा आणि त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्रभर जोर पकडते आहे. नगर जिल्ह्यासोबत इतर ठिकाणी देखील आता वकील संघटना आक्रमक झालेल्या असून सरकार दरबारी आत्तापर्यंत कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने या नाराजी मध्ये आणखीन भर पडते आहे.


शेअर करा